
सध्याच्या सरकारमध्ये आत्तापासूनच माईकची खेचाखेची सुरू आहे. त्यामुळे हे सरकार किती काळ टिकणार आहे, हे सांगता येणार नाही. त्यांच्याकडून मंत्रिमंडळाचा विस्तारही होत नाही. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान होत आहे, अशा काळात पूर्ण मंत्रिमंडळ हवे. प्रत्येक जिह्यात पालकमंत्री हवेत. त्यांच्यामार्फत दिलासा देण्याचे काम झाले पाहिजे. अडचणीच्या काळात मदत करणार नसाल, तर त्या सरकारकडून जनतेने काय अपेक्षा करायची, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला आहे. अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारसभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, ‘राज्यातील दोघांचे सरकार किती काळ टिकेल. हे सांगता येत नाही. आज पावसाने सर्वत्र जोर धरला आहे. अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. जिह्या-जिह्यामध्ये मंत्री पाहिजे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझे सरकार आल्यावर मी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करेल, असे जाहीर केले होते. त्यानुसार त्याचे नामकरण आम्ही केले होते. मग ‘आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चाललो आहोत’, असे म्हणणाऱया मुख्यमंत्र्यांनी नामांतराला स्थगिती का दिली? असा सवाल पवार यांनी यावेळी केला. शिवसेनेने यूपीएच्या प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिलेला आहे. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष असून, मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा हा त्यांचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपक केसरकर राजकारणात ज्युनिअर आहेत. 1992 साली ते आमच्यामध्ये आले, आता ते शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी अभ्यासपूर्वक बोलले पाहिजे. छगन भुजबळ, नारायण राणे हे वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडले. यात शरद पवारांचा संबंध नाही. केसरकर यांनी प्रवक्ते आहे म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नये. राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर राज्यामध्ये चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
सहकारी संस्थांमध्ये जुन्या-नव्या लोकांचा समावेश हवा. काही लोकांनी वयोमानानुसार सत्तेचा मोह सोडून बाजूला होत नव्यांना संधी दिली पाहिजे. शरद पवार यांनी वयोमानानुसार विविध संस्थांमध्ये नव्या लोकांना संधी देत मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारल्याचे सांगत अजित पवार यांनी मधुकर पिचड यांना टोला लगावला.



























































