द्रौपदीचा उल्लेख करत अजित पवारांकडून वादग्रस्त वक्तव्य, वाचा बातमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणावेळी द्रौपदीचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. स्त्री-पुरुष जन्मदराच्या गुणोत्तराविषयी बोलताना अजित पवार यांनी द्रौपदीचा उल्लेख केला. त्यामुळे अशा प्रकारे द्रौपदीचा उल्लेख करणं चुकीचं असल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे.

राज्यातलं स्त्री-पुरुष जन्मदराच्या गुणोत्तराविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही मधल्या काळात बघितलं, मुला-मुलींच्या जन्मदरात काही जिल्ह्यांमध्ये एवढी तफावत बघायला मिळाली की, 1000 मुले जन्माला आले की त्यावेळेस 800 ते 850 मुली जन्माला येत होत्या. पण हा दर 790 पर्यंत गेला. मी म्हटलं, पुढे तर अवघडच होणार आहे. पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? असा प्रसंग त्यावेळेस येईल, असं वक्तव्य त्यांनी केलं.

आपल्या विधानाविषयी त्यानंतर त्यांनी सारवासारव केली. ते म्हणाले की, याच्यातला गंमतीतला भाग जाऊद्या, नाहीतर अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला, असं म्हणतील. मला कुणाचाही अपमान करायचा नाही, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली. महाभारतात द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी होती. द्रौपदी पाच पांडवांची पत्नी होण्यामागचं कारण वेगळं होतं. मात्र, अशा प्रकारे द्रौपदीचा उल्लेख होणं हे साफ चुकीचं असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.