कोविड प्रतिबंधात्मक उपायोजनांचे काटेकोरपणे पालन करा, मंत्री बच्चू कडू यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा वाढता   प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने संचारबंदी घोषित केली आहे. तरी या काळात काही नागरिक विनाकारण फिरत असताना आढळून येत आहे. अशा व्यक्तींवर कारवाई करा व नागरिकांनी घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात कोविड-19  संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार  यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोविड रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेची अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन, रेडमीसिविर इंजेक्शन तसेच बेड ची कमतरता पडणार नाही, याकडे सतत लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. तसेच अकोट, बाळापूर व तेल्हारा येथे कोरोना रुग्णाचे वाढते प्रमाण लक्षात घेता या ठिकाणी ऑक्सीजन प्लॉट तसेच 30 खाटाचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यात. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करुन पॉझिटिव्ह रुगण बाहेर फिरणार नाही यासाठी मनपा प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव द्या

कोविड वॉर्डातील रुग्णांना लहान लहान बाबीत सेवा पुरविणेही आवश्यक असते, ह्या सेवा जर मनुष्यबळाआभावी पुरविता येत नसतील तर या रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळाची मागणी करण्यासाठी प्रस्ताव द्यावा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला दिले.

आज सायंकाळी ना.कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये, डॉ.कुसुमाकर घोरपडे, डॉ.श्याम शिरसाम, डॉ.दिनेश नैताम,तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी ना.कडू यांनी त्यांच्याकडे प्राप्त रुग्णांच्या तक्रारींच्या अनुषगाने विचारणा केली. यावेळी ना.कडू म्हणाले की, आपण सर्व डॉक्टर व आपले सर्व नर्स, आरोग्य कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहात. मात्र लहान लहान सेवांमध्ये उणीव भासल्याने रुग्ण नाराज होतात. तथापि या सेवांची उपलब्धता रुग्णांना करता यावी यासाठी मनुष्यबळाच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित झाला.त्यावेळी ना.कडू यांनी मनुष्यबळ स्थानिकरित्या उपलब्ध करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने प्रस्ताव द्यावा, असे निर्देश दिले.

रुग्णांना दिले जाणारे जेवण, उपचार सुविधा, ऑक्सिजन उपलब्धता व अत्यावश्यक औषधांची उपलब्धता याबाबतही त्यांनी माहिती घेतली. 

शहरात भव्य शहीद स्मारक उभारणार

देशासाठी बलिदान दिलेल्या जिल्ह्यातील वीरपुत्राचे स्मरणार्थ शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

जिल्ह्यातील 24 शहीदाचे सतत स्मरण व प्रेरणा मिळावी यासाठी शहरातील नेहरु पार्क जवळील शहिद स्मारकांचे नूतनीकरण करुन शहीदाचे पुतळे  त्याच्या कार्याच्या माहितीसह उभारण्यात येणार आहे. याठिकाणी  दोन फवारे तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पाईंटसुध्दा तयार करण्यात येणार आहे. स्मारकाच्या ठिकाणी उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. तसेच अग्रस्थानी रणगाडा ठेवण्यात येणार आहे. यासाठी करण्यात आलेले नियोजनाचे सादरीकरण पालकमंत्री याना दाखविण्यात आले. त्यावेळी त्यांनी त्यात काही बदल करण्याचे सुचविले.

ग्रामपंचायत भवनाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी आवश्यक सोईसुविधा झेरॉक्स, ई-सुविधा, तलाठी कार्यालय, कृषि केंद्र व कार्यालय अशा सुविधा एकाच ठिकाणी तयार करण्याबाबतचे नकाशाव्दारे सादरीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी पालकमंत्री यांच्यासमक्ष सादर केले. आवश्यक त्या सूचना देवून प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश पालकमंत्री ना. कडू यांनी दिले. तसेच  स्थानिक स्त्री रुग्णालयात सोईसुविधायुक्त आधुनिक रुग्णालय तयार करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश पालकमंत्री यांनी दिले. तसेच यावेळी झुमव्दारे उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्याशी पाणंद रस्ते विकास आराखडाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.