
अकोले तालुक्यातील संकेत नवले या तरुणाच्या हत्येच्या तपासाचे धागेदोरे थेट अमेरिका आणि हाँगकाँगपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. येथील कंपन्यांनी तयार केलेले डेटिंग ऍप संकेत आणि आरोपी वापरत असल्याचे तपासात समोर आले आहे. अटक केलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, हा खून नेमका कशामुळे झाला हे पोलिसांनी अद्यापि सांगितलेले नाही.
अकोले तालुक्यातील रहिवासी आणि अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी संकेत नवले याचा मृतदेह संगमनेर शहराजवळील सुकेवाडी शिवारातील नाटकी नाला परिसरात सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी शाहरूख शेख आणि सलमान शेख या दोन आरोपींना अटक केलेली आहे. मात्र, पोलिसांना या खुनाचे कारण अजूनही समजू शकलेले नाही. हा गुन्हा संपूर्ण तांत्रिक तपासावर अवलंबून आहे. तरीही नेहमीच्या पद्धतीने पोलिसांना खुनाचा तपास लावणे सध्या जिकिरीचे काम ठरत आहे. आरोपींनीच खून केला असा संशय पोलिसांना असला, तरी खुनाचे कारण, खुनासाठी कोणते हत्यार, वाहन वापरले, याची माहिती पोलिसांना नाही. शिवाय मयत संकेत नवलेच्या अंगावर असलेल्या वस्तूंपैकी टोपी, चष्मा, सॉक्स पोलिसांना अद्याप मिळून आलेले नाहीत. पोलिसांनी आरोपी शाहरुख शेख याच्या घराची झडती घेतली असली, तरी त्यांना संकेतच्या कोणत्याही वस्तू आढळून आलेल्या नाहीत. त्याचा मोबाईलदेखील पोलिसांना मिळालेला नाही.
दरम्यान, संकेत आणि आरोपी शाहरूख हे कोणते मोबाईल ऍप्लिकेशन वापरत होते, त्या मोबाईल अप्लिकेशनचे मयत नवले वापरत असलेल्या ऍप्लिकेशनशी कसे साम्य होते, अशी माहिती उपलब्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे दुसरा आरोपी सलमान शेख याला मोबाईल वापरता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलीस समलैंगिक संबंधांबाबत मत मांडत असले, तरी खून नेमका कोणत्या कारणाने करण्यात आला, याचा स्पष्ट उल्लेख होताना दिसत नाही. तर, पोलीस छळ करत असल्याची तक्रार आरोपीने न्यायालयाकडे केलेली आहे. त्यामुळे त्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
‘ती’ ऍप्लिकेशन्स नेमकी कोणती?
संकेत नवले हा अमेरिका, कॅलिफोर्निया आणि हाँगकाँगमधील कंपन्यांनी तयार केलेले डेटिंग मोबाईल ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये वापरत होता. आरोपी शाहरुख शेख जे मोबाईल ऍप्लिकेशन वापरत होता, ते ऍप्लिकेशन मयत संकेत नवलेच्या एका ऍप्लिकेशनसारखे असल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे. त्यामुळे पोलिसांनी अमेरिका, कॅलिफोर्निया आणि हाँगकाँगमधील या मोबाईल ऍप्लिकेशन निर्मिती कंपन्यांच्या मुख्य कार्यालयांमध्ये ई-मेलद्वारे संपर्क केला आहे. दरम्यान, हे ऍप्लिकेशन नेमके कशासाठी वापरले जात होते, हे मात्र पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही.
पोलिसांच्या भूमिकेबाबत संशयाचे वातावरण
दरम्यान, संकेत नवले याच्या खुनाचा तपास आणि अटक केलेल्या आरोपींबाबत पोलिसांच्या भूमिकेविषयी संभ्रमाचे वातावरण पसरलेले आहे. आमच्या मुलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी विनाकारण त्यांना पकडले असल्याचे आरोपींच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. तसेच, पोलिसांकडूनही याबाबत पाळली जाणारी गुप्तता आणि न्यायालयात मांडलेले मुद्दे या सर्व बाबींचा विचार करता जनतेमध्ये याप्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू आहे.






























































