
सामना ऑनलाईन । मुंबई
आपल्या नव्या मराठी चित्रपटाचा ‘चुंबक’चा ट्रेलर प्रकाशित करताना बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने मान्य केले की, तो मराठी चित्रपटांचा खूप मोठा चाहता आहे. तो म्हणाला की, हल्ली हिंदी चित्रपटांमध्ये कथेचा अभाव असतो हे मान्य करायला त्याला कोणतीही हयगय वाटणार नाही. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला चित्रपटाचे निर्माता नरेन कुमार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संदीप मोदी तसेच प्रख्यात गीतकार, गायक, कलाकार व या चित्रपटाचे मुख्य नायक स्वानंद किरकिरे, दोन नवोदित कलाकार संग्राम देसाई आणि साहिल जाधव सुद्धा उपस्थित होते.
अक्षय कुमार म्हणाला की “जर मला वेगळ्या कथांवरील चांगल्या पटकथा मिळाल्या तर त्या मराठी चित्रपटांची मी केवळ निर्मितीच करणार नाही तर त्यांमध्ये मी अभिनयसुद्धा करेन. मला रितेश देशमुखचा ‘बालक पालक’ आणि ‘लई भारी’ हे चित्रपट आवडले. दिवंगत दादा कोंडके या मराठीतील आघाडीच्या कलाकारावरील चरित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही केला होता. पण पटकथा मनासारखी जुळून आली नाही आणि तो प्रयत्न सोडून देण्याचा मी निर्णय घेतला.”
तो पुढे म्हणाला की, त्याने हा अत्यंत भाऊक असा चित्रपट निर्माते नरेन कुमार यांनी त्याच्यासाठी जो विशेष शो आयोजित केला त्यावेळी पहिला. हा चित्रपट म्हणजे नरेन आणि दिग्दर्शक संदीप मोदी यांनी एकत्र पाहिलेले स्वप्न होते आणि तो त्याच्याशी जोडला गेला हे तो त्याचे भाग्य मानतो. तो म्हणाला की, चित्रपट पाहिल्यावर त्याने या चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता म्हणून जबाबदारी घ्यायचे ठरवले. या चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता म्हणून त्याच्याशी जोडले जाताना त्याला पैशांची अपेक्षा होती का, असा प्रश्न विचारला असता, अक्षय म्हणाला की, पैशाचा विषय त्याच्या मनात कधी आला नाही. या चित्रपटाशी जोडले जाऊन त्यातून फायदा कमवावा असे त्याला कधी वाटले नाही, असेही तो म्हणाला.
“चुंबक’चा प्रस्तुतकर्ता म्हणून मला यातून नफा कमवायचा नाही. मराठी चित्रपटांची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढते आहे आणि मराठी चित्रपट आपल्या कक्षा अधिक रुंदावतो आहे. ज्या प्रकारच्या मराठी चित्रपटांची निर्मिती अलीकडे होते आहे आणि ज्याप्रकारे अस्सल व्यक्तिरेखा त्यात साकारल्या जात आहेत, त्या विश्वासार्ह अशाच आहेत. जर मी ठरवले असते तर मी ‘रावडी राठोड २’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली असती. पण मी ‘पॅडमॅन’सारखे चित्रपट निवडले कारण मला महिलांना दैनंदिन जीवनात ज्या समस्या भेडसावतात त्या लोकांसमोर आणायच्या होत्या,” तो प्रामाणिकपणे सांगतो.
पुढे म्हणाला, “चुंबक’मध्ये खराखुरा अभिनय आहे आणि खरेखुरे कलाकार आहेत. हा असा चित्रपट आहे की जो तुम्हाला सांगेल की तुमच्या आयुष्यात दोन मार्ग आहेत, एक चांगला आणि दुसरा वाईट. तुम्हाला त्यांपैकी कोणता निवडायचा हे ठरवायचे आहे. मी माझ्या २८ वर्षांच्या बॉलीवूडमधील कारकिर्दीत आत्तापर्यंत १३० चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि याआधी दोन मराठी चित्रपटांची निर्मितीही केली आहे. पण ‘चुंबक’सारख्या चित्रपटात काम केलेले नाही किंवा त्याची निर्मिती केलेली नाही.”
अक्षयने अभिमानाने सांगितले की, त्याने या चित्रपटाचे प्रदर्शन २७ जुलै रोजी करण्याचे ठरवले असून महाराष्ट्रातील तब्बल ३०० चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित होणार आहे. त्याने हा चित्रपट प्रस्तुत केला असल्याने चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीवर त्याचा काही सकारात्मक परिणाम होईल का, असे विचारले असता तो म्हणाला की, चित्रपटाची कथा महत्वाची असून त्याची प्रस्तुती कोण करतो आहे, याला फार किंमत नाही.
स्वानंद किरकिरेची तोंड भरून स्तुती करताना अक्षय कुमारने म्हटले की, संगीतातील मोठे नाव असलेल्या स्वानंदने अभिनयात जी कामगिरी केली आहे, तशी करायला त्यालाही आवडेल. “मला जे इतकी वर्षे करायचे आहे ते स्वानंदने त्याच्या पहिल्याच चित्रपटात एक कलाकार म्हणून साध्य केले आहे. त्यासाठी त्याला खूप कष्ट उपसावे लागले आणि वाट पहावी लागली, हेसुद्धा तितकेच खरे,” तो म्हणाला. अक्षय पुढे म्हणाला की, आज तो अस्खलित मराठी बोलतो त्याचे सारे श्रेय हे त्याच्या शाळेतील मराठी शिक्षिकेला आहे. “लोक मला विचारतात की मराठी चित्रपटांची निर्मिती करतो आहे, पण मला जर काम करायची वेळ आली तर मी ते करू शकेन का? दिग्दर्शक महेश टिळेकरच्या ‘अधिकार’ या मराठी चित्रपटात मी साधारण दहा वर्षांपूर्वी काम केलेले आहे. दोन मराठी चित्रपटांची निर्मितीही मी केली आहे,” तो म्हणतो.
स्वानंद किरकिरे म्हणाले, “मला सुरुवातीला असे वाटले की या चित्रपटाच्या संगीतासाठी चित्रपटाची टीम मला भेटते आहे. पण माझ्याकडून त्यांना अभिनय करून घ्यायचा आहे आणि त्यातही ही मुख्य भूमिका आहे, असे जेव्हा मला कळले तेव्हा मला धक्काच बसला. ही भूमिका म्हणजे एक आव्हान होते. पण चित्रपटाची पटकथा ऐकली आणि माझ्यावरील या टीमचा विश्वास बघितला व आम्ही म्हणजे मी, संदीप, सौरभ आणि नरेन यांनी त्यात उडी घ्यायचे ठरवले.” त्याने सोलापूरमधील एका छोट्या गावातून आलेल्या एका सध्या सरळ युवकाची भूमिका पार पाडली आहे.
“एक निरागस आणि गतिमंद अशा पुरुषाची व्यक्तिरेखा आम्हाला उभी करायची होती. आपल्या आसपासच्या लोकांचे निरीक्षण करत आणि त्याच्या जोडीला या क्षेत्रातील डॉक्टर आणि समुपदेशक यांच्याशी चर्चा करत ही व्यक्तिरेखा आकाराला आली आहे. ही व्यक्तिरेखा आम्ही एक एक वीट रचावी तशी अभ्यासत आणि सकारात गेलो. त्यातून त्यातील प्रेमळपणा या व्यक्तिरेखेत येत गेला आणि तिची प्रतिष्ठाही राखता आली,” असे उद्गार दिग्दर्शक संदीप मोदी यांनी काढले.




























































