अलिबागचे समुद्रकिनारे हाऊसफुल्ल

572

नवीन वर्षाच्या स्वागताला वीस दिवस उरले असतानाही अलिबाग जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले असून पर्यटक समुद्र स्नानाचा, घोडागाडी सवारी, उंट सवारी, बोट रायडिंगचा आनंद लुटत आहेत. त्याचबरोबर हॉटेल, लॉजेसही फुल झाले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताला रायगडला पर्यटक पसंती देत असल्याने 10 जानेवारी पर्यत हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेसची बुकिंग आधीच पर्यटकांनी केलेली आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झाल्याने काही प्रमाणात वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

शनिवार, रविवार लागून सुट्टी आली असल्याने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यातच आता थंडीही सुरू झाली असल्याने थंडीचा आस्वादही पर्यटकांना मिळत आहे. अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर या समुद्र किनारी पर्यटक दाखल झाले आहेत. समुद्र किनारी असलेले घोडा, उंट सवारी, केटीएम सवारी, बोटींग, पराग्लायडिंग याचा आस्वाद पर्यटक घेताना दिसत आहेत. तर बच्चे कंपनीही समुद्राच्या पाण्यात माजा करीत आहेत.

समुद्र किनाऱ्यासह रायगड किल्ला, माथेरान आणि जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळे ही गर्दिनी फुलली आहेत. पर्यटक वाहनाने आली असल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे समुद्र किनारी जाणाऱ्या रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहेत. नवं वर्ष स्वागताला अजून काही दिवस शिल्लक असले तरी पर्यटक आधीच जिल्ह्यात दाखल होताना दिसत आहे. त्यामुळे हॉटेल, लॉजेस, रिसॉर्ट यांचा व्यवसाय तेजीत सुरू आहेत. स्थानिकानाही पर्यटकांमुळे आर्थिक लाभ होत आहे. जिल्ह्यात पर्यटक समुद्र किनारी आले असून जिल्हा पोलीस तसेच स्थानिक प्रशासनही सतर्क झाले आहेत. समुद्र किनारी जीवरक्षकही तैनात करण्यात आलेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या