युद्धसमयी लाच घेणे देशद्रोह! युक्रेनचे सगळे सैन्य भरती प्रमुख बडतर्फ

russia-ukraine-war1
फोटो प्रातिनिधीक

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. युक्रेनमधील प्रादेशिक सैन्य भरती केंद्रांच्या सर्व प्रमुखांना त्यांनी बडतर्फ केले आहे. रशियाबरोबरचे युद्ध निर्णायक टप्प्यावर पोहोचले असतानाच झेलेन्स्की यांनी ही कारवाई केली आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केलेल्या आता 17 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे . युक्रेन बलाढ्य रशियाविरुद्ध निकराने लढा देत आहे. झेलेन्स्की यांनी या निर्णयाबाबत बोलताना म्हटले की, एका तपास मोहीम राबविण्यात आले होते, ज्यात दिसून आले की संपूर्ण युक्रेनमध्ये सैन्याचे अधिकारी चुकीच्या पद्धतीने लोकांना भरती करत असून ते लोकांना देशाबाहेर काढण्यासाठी गैरमार्गांचा अवलंब करत आहेत.

युद्धासाठी सक्षम आणि पात्र असलेल्या सगळ्या पुरुषांना युक्रेन सोडण्यास मनाई करण्यात आली होती, मात्र यासाठी इच्छुक नसलेल्या पुरुषांना भ्रष्ट पद्धतींचा अवलंब करत देशाबाहेर काढलं होतं. झेलेन्स्की यांनी सांगितले की सैन्य दलाच्या मसुदा मंडळाच्या अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याच्या आरोपाखाली 112 खटले दाखल करण्यात आले आहेत. हा युद्धकाळातील भ्रष्टाचार असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. ज्यांना युद्ध आणि युद्ध परिस्थिती माहिती आहे अशा लोकांच्या हाती यंत्रणा देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. बडतर्फ अधिकाऱ्यांच्या जागी माजी सैनिक आणि युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची नियुक्ती केली जाईल, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

रशियन हल्ल्यात बालकाचा मृत्यू

दरम्यान, युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाने डागलेल्या क्षेपणास्त्रात पश्चिम युक्रेनमध्ये आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार पोलंडच्या सीमेपासून सुमारे 100 किलोमीटर (60 मैल) पश्चिम युक्रेनच्या इव्हानो-फ्रँकिव्हस्क प्रदेशातील एका घरावर क्षेपणास्त्र पडले होते ज्यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला आहे.

रशियाने सलग तीन दिवस मॉस्कोला लक्ष्य करण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केल्याचा युक्रेनवर आरोप केला आहे. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले नसले तरी या हल्ल्यांमुळे रशिया हादरला असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाने केलेला दिवसाढवळ्या केलेला क्षेपणास्त्र हल्ला युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने परतवून लावल्याचा दावा युक्रेनने केला आहे. विफल झालेल्या क्षेपणास्त्रांचा ढिगारा लहान मुलांच्या रुग्णालयावर आणि निवासी भागांवर पडला, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान , मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, पश्चिम मॉस्कोमध्ये एक ड्रोन रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाडला आहे ज्यामुळे हल्ला टाळता आला. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा ड्रोन करामीशेव्हस्कायापासून जवळच पाडण्यात यश आले. करामीशेव्हस्काया हा रशियातील व्यवसायासाठीचा प्रमुख जिल्हा आहे. या जिल्ह्यावर यापूर्वी दोनदा ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे .