जप्तीची कारवाई करत भाजपने माढय़ातील राष्ट्रवादीचा नेता पळवला; अभिजीत पाटील यांच्या कारखान्यावरील कारवाई मागे

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांचा काैल भाजपसाठी निर्णायक ठरणार आहे. म्हणून भर निवडणुकीतही साम, दाम, दंड, भेद करून नेते पळवण्याचा सपाटा भाजपने कायम ठेवला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार यांचे निकटवर्तीय अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आणि त्यांनी भाजपला पाठिंबा देताच कारवाई मागे घेण्यात आली. ही सर्व सूत्रे दुसऱया पक्षांचे नेते पळवण्यात अनुभवी असलेल्या फडणवीसांनी नेहमीच उत्तमरित्या हलवली.

माढा लोकसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत होणार आहे. माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार सुरू असतानाच अभिजीत पाटील अध्यक्ष असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कर्जवसुलीची कारवाई करण्यात आली.

दोन दिवसांत कारखाना, गोदामांवरील जप्ती मागे

भाजपला पाठिंबा जाहीर करताच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई नाटय़मयरीत्या मागे घेण्यात आली. त्याचबरोबर सील केलेली तीन गोदामे सीलमुक्त करून कारखान्याच्या ताब्यात देण्याचा आदेश कर्ज वसुली लवादाने दिला. पाटील यांनी माढा आणि सोलापुरात भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर दोनच दिवसांत पाटील यांच्या कारखान्यावरील कारवाई मागे घेण्यात आली.