यवतमाळ येथे शिळ्या अन्नातून 19 जणांना विषबाधा, तीन चिमुकल्यांनी प्रकृती चिंताजनक

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजी येथे एका धार्मिक कार्यक्रमात 19 जणांना शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. रुग्णांना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार दाखल केले असून, वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात तीन चिमुकल्यांनी प्रकृती चिंताजनक आहे.

मे महिन्यात देवपूजेच्या कार्यक्रमात बोकडाचा बळी देण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे आणि या ठिकाणी गाव जेवण देण्यात येते. पूर्वापार पासून सुरू असलेल्या प्रथेनुसार म्हसोबा तांडा आणि अंजी येथे बोकडाचा बळी देण्यात आला. पण तेच बोकडाचे मटण काहींनी बुधवारी सकाळी खाल्ले. सध्या जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ्यामुळे तापमान वाढले आहे. अशातच मंगळवारी रात्रीचे शिळे अन्न खाल्ल्याने काहींना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. या सर्वाना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. घटनेचे गांभीर्य ओळखता डॉक्टरांनी या सर्व रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू केले. या 19 रूग्णांपैकी 16 जणांची प्रकृती स्थिर आहे तर तीन चिमुकल्यांनी प्रकृती अद्यापही गंभीर आहे. सर्व डॉक्टर आणि प्रशासन या घटनेकडे लक्ष देऊन आहेत. दरम्यान डॉक्टरांनी उन्हाळ्यात शक्यतो शिळे अन्न खाऊ नये असे सर्वांना आवाहन केले आहे.