मिऱ्या-नागपूर महामार्ग कामाचा नागरिकांना मनस्ताप, घराकडे जाणारे रस्ते बंद; खोदकामामुळे पावसाळ्यात होणार डबकी

मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामाचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. कुवारबाव परिसरात महामार्गाच्या कामामुळे अनेक घरांचे रस्ते बंद झाले. महामार्गाच्या कामामध्ये खोदलेल्या खड्ड्यात पावसाळ्यात डबकी तयार होणार आहेत. त्यामुळे नागरीकांना त्याचा आणखी त्रास सहन करावा लागणार आहे.

कुवारबाव येथील बाजारपेठ उठवून महामार्गाचे काम सुरु झाले. रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामामुळे काहींच्या घरांचे रस्तेच बंद झाले आहेत. डॉ.पी. डी. कोपर्डे यांच्या घराकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद झाले आहेत. जणू त्यांचा कुवारबावशी संपर्कच तोडला गेला होता. अखेर आरडाओरडा केल्यानंतर ठेकेदाराला जाग आली आणि त्याने दोन्ही रस्ते सुरू करून दिले. याच परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी हे खड्डे भरले नाहीत तर त्या ठिकाणी डबकी तयार होणार आहेत. त्याचा त्रास कुवारबाववासियांना भोगावा लागणार आहे. डासांचा प्रादुर्भाव झाल्यास आरोग्याला हानिकारक होणार आहे. डबक्यांमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

नागरीकांना करावा लागतोय धुळीचा सामना
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. कुवारबावपासून हातखंबापर्यंत या कामाने वेग घेतला आहे. महामार्गाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धुरळा पसरल्यामुळे रत्नागिरीकर घुसमटले आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना दररोज धुळीचा सामना करावा लागतो. महामार्गाच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेकवेळा या परिसरात ट्रॅफिक जाम होते.