बिल्डर विशाल अग्रवालवर शाई फेकली, वंदे मातरम संघटेनेचे सहा ते सात कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्यावर न्यायालय परिसरात शाईफेक केल्याची घटना घडली आहे. पुणे पोलिसांकडून बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी मोटारीतून आणले जात होते. त्यावेळी वंदे मातरम् संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत त्याच्यावर शाई फेकली. मात्र, त्याचवेळी कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांनी सहा ते सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

कल्याणीनगर परिसरात बेदरकारपणे अलिशान मोटार चालवून मद्यधुंद अल्पवयीन मुलाने दोघांचा जीव घेतला होता. याप्रकरणात बाल न्याय मंडळाने अल्पवयीनाला जामीन मंजूर केला. मात्र, मुलाचे वडील विशाल अगरवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले. बुधवारी दुपारच्या सुमारास अगरवालला न्यायालयात आणण्यात येत होते. त्यावेळी न्यायालयाबाहेर पोलिसांची गाडी त्याला घेउन येत असल्याचे पाहताच वंदे मातरम संघटनेच्या 6 ते 8 कार्यकर्त्यांनी व्हॅनकडे धाव घेत शाई फेकली. त्यामुळे सत्र न्यायालयाबाहेर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांनी संघटनेच्या कार्य़कर्त्यांना रोखत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपीवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. अल्पवयीन जेवढा जबाबदार आहे, त्याचे वडीलही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.