दारू सोडण्याच्या नादात दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर; औषधं ठरली घातक

दारूच्या व्यसनापासून सुटका मिळवण्यासाठी काही तरुणांनी औषधं घेतले. यापैकी दोन तरुणांचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची धक्कादायक घटना जिल्हातील भद्रावती तालुक्यात घडली आहे. सहयोग जीवतोडे (19), प्रतीक दडमल ( 26 ) अशी मृत तरुणांची नावे आहेत. जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात येणाऱ्या वडेगाव-गुडगाव येथील काही तरुणाना दारूचे व्यसन लागले होते. या व्यसनापासून सुटका मिळविण्यासाठी या तरुणांनी दारू सोडण्याची औषध घेतली. औषधं घेतल्याने चार तरुणांची अचानक प्रकृती बिघडली. त्याना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यात सहयोग जीवतोडे, प्रतीक दडमल या दोघांचा मृत्यू झाला. तर सदाशिव जीवतोडे ( 45 ),सोमेश्वर वाकडे ( 35 ) यांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांवर उपचार सुरु आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

‘ तो ‘ वैद्य कोण?

दारू सोडविण्यासाठी हे चारही तरुण वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे एका वैद्याकडून दारू सोडण्याचे औषध घेण्यासाठी मंगळवारला ( 21 मे )गेले होते. तिथे त्यांनी औषधं घेतली.दुपारी आपल्या गावी परत आले. त्यानंतर या चौघांची प्रकृती अचानक तब्येत बिघडली.त्यांना भद्रावती येथे उपचारासाठी हळविण्यात आले. मात्र उपचारला नेत असताना दोघांचा मृत्यू झाला. दोघांवर उपचार सुरू आहे.

दारू सोडण्याचे औषध देणारे वैद्य शेळके महाराज यांना समुद्रपुर पोलीस स्टेशन अंतर्गत चौकशी करीता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे. तपासाअंतीचा अहवाल समुद्रपुर पोलीस स्टेशन कडे पाठविण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे. शेडेगाव येथील वैद्य शेळके महाराज यांच्याकडे दारू सोडविण्यासाठी अनेक व्यसनी व्यक्ती जात असतात. या अगोदरही दारू सोडविण्याची औषध घेवून आल्यानंतर अनेक व्यसनीचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे शेळके महाराज व त्याच्या दारू सोडविण्याची औषध या दिशेने कसून तपास होण्याची व कारवाई करण्याची गरज असल्याचे परिसरात बोलले जात आहे.

ग्रामीण भागात व्यसनाचे प्रमाण खूप वाढले आहे. मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी गेलेले आढळून येतात. दररोज ग्रामीण भागात दारूच्या पेट्या विकल्या जातात. प्रत्येक गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण आहे. त्यामुळे या दिशेनेही पोलीस तथा सामाजिक संस्थांनी कार्य करण्याची गरज आहे.