यवतमाळकरांनी घेतली शून्य सावलीची अनुभूती

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ कधीच सोडत नाही, असे म्हणतात पण आज ता.22 मे ला तो दिवस आलाच. दुपारी 12.15 ची वेळ झाली आणि काही मिनिटे सावली ही दिशेनाशी झाली. दुपारी 12 वाजून 35 मिनिटांपर्यंत हा अनुभव यवतमाळकरांनी घेतला. यवतमाळ येथे अनेक हौशी चिमुकल्यांनी आपापल्या घराजवळ आणि गच्चीवर भर दुपारी सावली गायब गायब झाल्याचा वैज्ञानिक चमत्कार अनुभवला.

आपल्या पृथ्वीचा अक्ष 23.30 अंशांनी कलला असल्यामुळे आपण दक्षिणायन, उत्तरायण व दिवसाचे लहान-मोठे होणे अनुभवत असतो. याचाच परिणाम म्हणून शून्य सावलीचा अनुभव आपल्याला येतो. महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो .

महाराष्ट्रात 3 ते 31 मे पर्यंत शून्य सावली दिवस आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी बारा ते 12.35 दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळय़ा जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल.आता पुढील दिवशी खालील गावांना शून्य सावलीचा आनंद घेता येईल

23 मे – खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड
24 मे – धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर
25 मे – जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा
26 मे – नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा
27 मे – नंदुरबार, शिरपुर, बुऱ्हाणपूर, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक
28 मे – अक्कलकुआ, शहादा, पांढुर्णा, वरुड, नरखेड,
29 मे – बोराड, नर्मदा नगर,
30 मे – धाडगाव
31 मे – तोरणमाळ.
(स्थानिक पातळीवर वेळेत थोडासा फरक पडू शकतो.)