T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत संदर्भात युवराज सिंगने केले मोठे वक्तव्य

हार्दिक पंड्यासाठी IPL 2024 ही स्पर्धा एका भयानक स्वप्नासारखी ठरली आहे. चहुबाजूंनी होणारी टीका आणि सुमार खेळ या सर्व गोष्टींमुळे हार्दिक संपूर्ण आयपीएलमध्ये चाहत्यांसहीत हिंदुस्थानच्या माजी खेळाडूंच्या रडारवर होता. असे असताना टी20 वर्ल्ड कपसाठी हार्दिकची निवड झाली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र आता सिक्सर किंग युवराज सिंगने हार्दिक पंड्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

युवराज सिंगने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची पाठराखण केली आहे. तसेच तो टी20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करेल असे म्हंटल आहे. टी20 वर्ल्ड कपचा अॅम्बेसेडर असणाऱ्या युवराज सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या. “आपण फक्त आयपीएलचा फॉर्म बघितला तर हार्दिक अपयशी ठरला आहे. हिंदुस्थानसाठी त्याची मागील कागमिरी पाहता, त्याने टीम इंडियासाठी जे काही केले आहे, ते महत्वाचे आहे. त्यामुळेच तो संघामध्ये आहे. मला वाटत की त्याची गोलंदाजी आणि त्याचा फिटनेस महत्वाचा ठरणार आहे,” असे म्हणत युवराज सिंगने हार्दिकची पाठराखण करत त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.

“चांगली गोष्ट म्हणजे निवड प्रक्रिया झाली आहे. निवडकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंनी कशी कामगिरी केली ते प्रथम पाहिले आणि नंतर त्यांचा आयपीएल फॉर्म पाहिला. फक्त आयपीएल फॉर्मवर त्यांची निवड झालेली नाही,” असे युवराज सिंग म्हणाला.

“संजू सॅमसन चांगच्या फॉर्ममध्ये आहे. मात्र मी ऋषभ पंतची निवड करेन कारण तो डावखूरा फलंदाज आहे. ऋषभ पंतकडे टीम इंडियासाठी सामना जिंकवण्याची क्षमता आहे, जे त्याने यापूर्वी सुद्धा केले आहे,” असे म्हणत युवराज सिंगने संजू सॅमसनच्या तुलनेत ऋषभ पंतवर अधिक विश्वास दर्शवला आहे.