विश्वास नांगरे पाटीलांच्या नावाचा वापर करून महिलेची फसवणूक; तब्बल 40 लाख रुपयांचा गंडा

तंत्रज्ञानाच्या जगात इमेल, मॅसेज आणि फोन कॉसच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. कधी बँकेतून तर कधी कस्टमर केअर मधून कॉल किंवा मॅसेज करुन सामान्य नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार घडत आहे. दरम्यान संपूर्ण जग डिजिटलमय झाल्यामुळे हे प्रकार वाढू लागले आहेत. अशीच एक घटना अलिबागमधील एका महिलेसोबत घडली आहे. एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने या महिलेला तब्बल 40 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात आणि पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

सदर घटना अलिबागमधील गोंधळपाडा परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेला रात्री 9 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तिचा व्हॉट्सअॅप कॉल आला होता. ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरेटी ऑफ इंडियामधून मी बोलत आहे. मॅडम तुमच्या आधारकार्डचा गैरवापर झाला आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल फोन लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. असे सांगण्यात आले. मुख्य म्हणजे या फोनवर पोलीस अधिकारी विश्वास नांगरे आणि दीक्षित मॅडम देखील असल्याचे त्या महिलेला सांगून तिचा विश्वास संपादीत केला.

दरम्यान महिलेला ईडी, सी.बी.आय सारख्या मोठ्या यंत्रणेंची भीती देखील घातली. मॅडम तुमच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असून ईडी, सी.बी.आय आणि मुंबई पोलिसांकडे तुमच्या नावाचे अटक वॉरेंट देखील आहे. असे त्य़ा महिलेला सांगण्यात आले. त्यामुळे ती महिला पूर्णपणे घाबरली होती आणि फेक कॉलरच्या जाळ्यात अडकली. याच संधीचा फायदा घेउन आरोपीने महिलकडून बँक खात्यांची सर्व माहिती घेतली. यानंतर अचानक महिलेच्या बँक खात्यातून परस्पर ऑनलाईन 40 लाख 73 हजार 719 रुपये गायब केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आपली फसवूण झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे.