उन्हापासून वाचण्यासाठी नदी पात्रात उतरले; पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा बुडून मृत्यू

नगरसहित महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. ग्रामीण भागांमध्ये उष्णतेपासून वाचण्यासाठी तरुण मुले नदी, विहिर आणि कालव्यांवर पोहण्याला पसंती देत आहेत. अकोले तालुक्यातील दोन तरुण सुद्धा अंगाची लाही कमी करण्यासाठी प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे.

सदर घटना अकोले  तालुक्यातील सुगांव बुद्रुक येथे घडली आहे. सागर जेडगुले (वय 25) राहणार धुळवड तालुका सिन्नर आणि अर्जुन जेडगुले (वय 18) राहणार पेमगीरी, तालुका संगमनेर ही मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. शेतकऱ्यांच्या पशुधनास लागणारा मुरघास बनविण्यासाठी सिन्नर व संगमनेर तालुक्यातील काही तरुण अकोले तालुक्यातील धुमाळवाडी गावात आले होते. मुरघास बनविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व तरुण अकोल्यातील सुगांव बुद्रक जवळ असणाऱ्या प्रवरा नदीच्या पात्राजवळ थांबले होते. भंडारदर्यातील लाभक्षेत्रासाठी उन्हाळ्यातील सिंचनाचे आवर्तन सुरू असल्यामुळे नदीपात्रात बऱ्यापैकी पाणी होते. उष्णतेमुळे तरुणांनी पाण्यात पोहण्याचा निर्णय घेतला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचाही पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी स्थानिकांच्या मदतीने तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधमोहिमेत सागर जेडगुले याचा मृतदेह सापडला आहे. मात्र अर्जुन जेडगुले याचा मृतहेद अद्याप सापडला नाही.