तरुणांचा प्रताप; चालत्या स्कुटीवर केली आंघोळ, पोलीस करणार कारवाई?

वाढत्या गर्मीमुळे सध्या देशभरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गर्मीपासून वाचण्यासाठी आणि शरिराला थंड ठेवण्यासाठी विविध क्लृप्त्यांचा वापर केला जात आहे. मात्र अशातच चालत्या स्कुटीवर आंघोळ करत असतानाचा तरुणांचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सदर व्हिडीओ हा उत्तर प्रदेशातील मुरादाबमधून व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुण चालत्या स्कुटीवर आंघोळ करत असाताना रिल बनवत असल्याचे दिसत आहे. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर काही मिनीटांमध्येच तुफान व्हायरल झाला. मात्र या दोन तरुणांनी केलेला हा प्रकार नियमांची पायमल्ली करणारा ठरला आहे. हेल्मेट शिवाय चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवताना हे तरुण दिसत आहेत.

मुरादाबाद पोलिसांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला असून पोलिसांनी आता व्हिडीओची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. “सदर प्रकाराची तपासणी केली जात आहे. तपासणीच्या आधारावर संबंधित तरुणांवर कारवाई केली जाईल,” असे मुरादाबादचे पोलीस अधिकारी सुभाष चंद्र गंगवार यांनी सांगितले. लाईक आणि व्यू मिळवण्याच्या नादात रिल बनवणे सदर तरुणांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.