बांगलादेशच्या बेपत्ता खासदाराचा संशयास्पद मृत्यू; कोलकात्यात आढळला मृतदेह

बांगलादेशचे खासदार अन्वर उल अझीम यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ते उपचारासाठी हिंदुस्थानात आले होते. मात्र हिंदुस्थानात आल्यानंतर ते बेपत्ता झाले होते. यानंतर अझीम यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरु करण्यात आली. तसेच बांगलादेश गुप्तचर विभागाने देखील तपास सुरू केला. मात्र बुधवारी सकाळी कोलकात्यातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. अझीम यांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अझीम हे बांगलादेशचा अवामी लीग या पक्षाचे तीन वेळा खासदार राहिले आहेत.

दरम्यान, अन्वर उल अझीम 12 मे रोजी कोलकात्यात उपचार घेण्यासाठी आले होते. मात्र दुसऱ्याच दिवसापासून त्यांचा फोन बंद येत होता. 12 तारखेनंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. 13 मे ला अझीम यांची बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना काळजी वाटू लागली. अझीम यांची बेपत्ता झाल्याची माहिती मिळतात त्यांच्या मुलाने बांगलादेश पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला. खासदार अझीम हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा फोन बिहारच्या परिसरात बंद झाला. यानंतर पोलीस घटनेची चौकशी करत असताना कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये अझीम यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. तसेच जेथे मृतदेह आढळला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे.

सदर घटनेला कोलकाता पोलिसांच्या हवाल्याने बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी दुजोरा दिला आहे. ‘कोलकाता येथे खासदार अझीम यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी बांगलादेश पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही नियोजित हत्या होती. हत्येमागचे कारण लवकरच स्पष्ट होईल. या प्रकरणात हिंदुस्थानी पोलीस सहकार्य करत आहेत.’ असे असदुझ्झमन खान म्हणाले आहेत. बांगलादेश सरकार या घटनेचा अहवाल मागवण्याची शक्यता आहे.