आता मने जिंकण्याचा बंगळुरूचा प्रयत्न

आयपीएलमधील आव्हान संपल्यामुळे सर्वांना निराश करणारा तळाचा राजा बंगळुरू उद्या शनिवारी गुजरातविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर समाधानकारक कामगिरी करून आपल्या चाहत्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. गुजरातचे स्पर्धेतील आव्हान कायम असले तरी बंगळुरूविरुद्धची त्यांची कामगिरी त्यांचा पुढचा प्रवास निश्चित करू शकतो. त्यातच आरसीबीने गुजरातला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवले होते. आता या सामन्यात गुजरात पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल यात शंका नाही.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आरसीबीचे आयपीएल विजेतेपद पटकावण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. 10 सामन्यांपैकी 7 सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले असून आरसीबी सध्या दहाव्या क्रमांकावर आहे, तर दुसरीकडे गतवर्षी अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या गुजरातची यंदाच्या आयपीएल मोसमातील कामगिरी असमाधानकारक झाली आहे. ते सध्या 10 सामन्यांमध्ये 4 विजय आणि 6 पराभवांसह आठव्या स्थानी आहेत.

उद्याचा सामना हा चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असल्याने तुफान फटकेबाजी पाहायला मिळणार हे निश्चित आहे. 28 एप्रिल रोजी झालेल्या गुजरातविरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी कमाल करून दाखवली होती. विराट कोहली आणि विल जॅक्स या दोघांनी केलेल्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने 200 धावांचा डोंगर सर करण्याची किमया केली होती. गुजरातच्या घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 200 धावा जमवल्या होत्या. यामध्ये साई सुदर्शनने 49 चेंडूत 84 धावांची, तर शाहरुख खानने 30 चेंडूत 58 धावांची उत्तम खेळी केली होती. या दोघांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने 200 धावा धावफलकावर लावल्या. मात्र, निष्प्रभ गोलंदाजीमुळे गुजरातच्या पदरी निराशाच पडली. आरसीबीचा कर्णधार फाफ डयु प्लेसिस स्वस्तात बाद झाल्यानंतर विल जॅक्स नावाच्या वादळात गुजरातचे गोलंदाज पालापाचोळय़ासारखे उडून गेले. जॅक्सने 41 चेंडूत 100 धावांची खेळी करून आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.