अर्जेंटिनाकडून हिंदुस्थानी महिलांचा धुव्वा, एचआयएच महिला प्रो-लीग अभियान युरोप दौरा

हिंदुस्थानी महिला हॉकी संघाच्या एफआयएच महिला प्रो-लीग अभियानाच्या युरोप दौऱयाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. बेल्जियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत अर्जेंटिनाने हिंदुस्थानी महिलांचा 5-0 गोल फरकाने धुव्वा उडविला.

अर्जेंटिनाकडून जुलिएटा जानकुनास (53 व्या, 59 व्या मिनिटाला) हिने दोन गोल केले. याचबरोबर ऑगस्टिना गोर्जेलॉनी (13 व्या मिनिटाला), वेलेंटिना रापोसो (24 व्या मिनिटाला) व व्हिक्टोरिया मिरांडा (41 व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल केला. नवीन प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या सामन्यात हिंदुस्थानी संघाची भट्टी जमलेली दिसली नाही. माजी कर्णधार व अनुभवी गोलरक्षक सविता पुनिया हिची संघात निवड झालेली असतानाही अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीत तिला बाकावर बसवून बिचू देवी खारीबाम हिच्यावर गोलरक्षकाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पहिल्या मिनिटापासून आक्रमक झालेल्या अर्जेंटिनाला मध्यंतरापर्यंतच सात पेनल्टी कॉर्नर मिळाले. तिसऱया क्वार्टरमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी थोडा चांगला खेळ केले, पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. आता हिंदुस्थानी महिलांचा पुढील सामना उद्या गुरुवार, 23 मे रोजी यजमान बेल्जियमशी होईल.