राहुरी कृषी विद्यापीठाच्या कांदा बियाणे खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद, पहिल्याच दिवशी 4500 किलो कांदा बियाणाची विक्री

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील फुले समर्थ व फुले बसवंत 780 या कांदा बियाणाच्या विक्रीतून पहिल्याच दिवशी कृषी विद्यापीठाच्या तिजोरीत 67 लाख रुपये जमा झाले आहेत. यंदा पहिल्याच दिवशी 4500 किलो बियाणाची विक्री झाली. मागील वर्षी पहिल्या दिवशी 600 किलो कांदा बियाणाची विक्री होऊन 9 लाख रुपये कृषी विद्यापीठास मिळाले होते.

कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या उपस्थितीत फुले समर्थ व फुले बसवंत 780 या कांदा बियाणाची विद्यापीठातील बियाणे केंद्रात विक्री सुरू झाली आहे. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव अरुण आनंदकर, नियंत्रक सदाशिव पाटील, अधिष्ठाता डॉ. विठ्ठल शिर्के, सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते हिरामण मंडलिक (रा. दुगाव, ता. चांदवड, जि. नाशिक) तसेच राहुरीतील मंदाकिनी औटी या शेतकऱयांना कांदा बियाणे देऊन विक्री सुरू करण्यात आली. यंदा शेतकऱयांसाठी कृषी विद्यापीठात 15 टन कांदा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले होते.

शेतकऱयांना त्यांच्या भागात कांदा बियाणे मिळावेत, या उद्देशाने राहुरी कृषी विद्यापीठाकडून यावर्षी कांदा उत्पादक असणाऱया नाशिक, नगर व सातारा जिह्यातील कृषी विद्यापीठाच्या अनेक केंद्रांमध्ये बियाणे विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक जिह्यातील कृषी संशोधन केंद्र निफाड, कांदा-लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत, कृषी संशोधन केंद्र लखमापूर तसेच कृषी महाविद्यालय मालेगाव, सातारा जिह्यातील कृषी संशोधन केंद्र बोरगाव, कृषी विज्ञान केंद्र धुळे, कृषी महाविद्यालय पुणे, नगर जिह्यातील राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय हळगाव, जामखेड व नगर-पुणे रस्त्यावरील कृषी संशोधन केंद्र चास या ठिकाणी फुले समर्थ बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे.

विद्यापीठाला मिळाले 67 लाखांचे उत्पन्न

z कांदा-बियाणे विक्रीच्या पहिल्या दिवशी राहुरी येथे 2417 किलो बियाणे व कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील उर्वरित दहा जिह्यांच्या विक्री केंद्रामध्ये 2083 किलो बियाणे विक्री होऊन एकूण 67 लाख रुपये विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी पहिल्या दिवशी 600 किलो कांदा बियाणाची विक्री होऊन 9 लाख रुपये कृषी विद्यापीठास मिळाले होते.