उजनी बोट दुर्घटना, चाळीस तासानंतर बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह सापडले

उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रात 21 मे रोजी सायंकाळी बोट दुर्घटनेत बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह अखेर सापडले आहेत. चाळीस तासांच्या शोधमोहिमेनंतर आज गुरुवारी त्यांना हे मृतदेह सापडले आहेत. यात दोन लहान मुलांसह दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. यावेळी बुडालेल्या लोकांचे नातेवाईक तिथेच बसून होते. मात्र मृतदेह बाहेर काढताच त्यांनी एकच हंबरडा फोडला.दरम्यान त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

उजनी धरण पात्रात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वारा सुटला होता. या वादळी वाऱ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशीहून करमाळा तालुक्यातल्या कुगावकडे ही बोट जात होती. मात्र अचानक वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बोट उलटी झाली, या बोटीमधले सहा जण बुडाले होते. यात कुगाव येथील पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे यांना पोहता येत असल्याने ते बचावले आणि त्यांनी पोहत पाण्याबाहेर येऊन ही घटना सांगितली होती. बेपत्ता लोकांमध्ये दोन लहान मुलांसह तीन महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे. मंगळवार संध्याकाळपासून त्यांची शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रात मंगळवारी बुडालेली प्रवासी बोट सोमवारी सापडली. जवळपास 35 फूट खोल पाण्यात ही बोट सापडली होती. मात्र 6 जण बेपत्ताच होते. अखेर आज सकाळी त्यांचे मृतदेह सापडले.

या दुर्घटनेतील गोकुळ दत्तात्रय जाधव ( 30), कोमल गोकुळ जाधव ( 25), माही गोकुळ जाधव (3), शुभम गोकुळ जाधव (18, सर्व रा. झरे ता. करमाळा) अनुराग ज्ञानदेव अवघडे (26), गौरव धनंजय डोंगरे (24) यांचा शोध लागला असून सहाही जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.