नालेसफाईची निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली

पावसाळा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही अद्याप शहरातील ओढे व नाल्यांच्या साफसफाईचे काम सुरू झालेले नाही. महापालिकेने राबवलेली निविदा प्रक्रियाही आचारसंहितेच्या कचाटय़ात सापडली आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान होऊनही अद्याप आचारसंहिता शिथिल न झाल्याने निविदा मंजुरीला परवानगी मिळण्यासाठी महापालिका जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात ओढे-नाल्यांतील गाळ व त्यावरील अतिक्रमणे, वळवलेले व बंदिस्त केलेले प्रवाह यामुळे अनेक भागातील घरात पावसाचे पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. याबाबत महापालिकेने सर्वेक्षणही केलेले आहे. त्यानुसार शहरातील 41 नैसर्गिक ओढे-नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे किंवा त्यावर बंद पाईप टाकून ते बंदिस्त करण्यात आल्याचे, नैसर्गिक प्रवाह वळवण्यात आल्याचे मनपाने सादर केलेल्या अहवालात उघड झाले आहे.

नगर शहरात एकूण 95 किमी लांबीचे ओढे-नाले आहेत. तसेच मनपाच्या पथकाने केलेल्या पाहणीत शहरात 140 ठिकाणी पाणी तुंबत असल्याचे आढळून आले होते. हे प्रवाह मोकळे करण्यासह ओढे व नाल्यातील गाळ काढण्याचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे अपेक्षित आहे. महापालिकेने या कामासाठी सुमारे 41.35 लाख रुपये खर्चाची निविदाही काढली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अद्यापि कायम असल्याने ही निविदा मंजूर होऊ शकलेली नाही. अत्यावश्यक बाब म्हणून ही निविदा मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर नालेसफाईचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, पावसाळा 15 दिवसांवर येऊन ठेपल्याने त्यापूर्वी सर्व ओढे-नाल्यातील गाळ काढण्याचे व बंदिस्त प्रवाह मोकळे करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.