ठाण्यातील न्यू होरायझन स्कूलवर डोळ्यात तेल घालून वॉच; EVM च्या स्ट्राँगरुमबाहेर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा 24 तास खडा पहारा

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी पार पडल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन्स घोडबंदर येथील न्यू होरायझन स्कूलमध्ये उभारलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवल्या आहेत. या स्ट्राँग रूममध्ये कोणतीही गडबड होऊ नये म्हणून सर्वपक्षीय उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी २४ तास खडा पहारा देण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक यंत्रणेची त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा असली तरी सर्व पक्षांचे कार्यकर्ते न्यू होरायझन स्कूलवर डोळ्यांत तेल घालून वॉच ठेवत आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार असून तोपर्यंत कार्यकर्त्यांची करडी नजर राहणार आहे.

राज्यात निवडणुकांचे पाच टप्पे संपताच मतदान झालेल्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्राँग रूमवरून तक्रारी येण्यास सुरुवात झाली. सीसीटीव्ही अचानक बंद होणे, संवेदनशील भागात अज्ञात व्यक्तींच्या हालचाली तसेच येथील विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना राज्यातील विविध भागांत घडल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती ठाण्यात होऊ नये म्हणून मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही प्रक्षेपण उमेदवारांच्या प्रतिनिधींनाच पाहता येणार आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाने ही मुभा दिली असून एकूण 64 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.

संशयास्पद हालचालींवर लक्ष

सातारा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात या स्ट्राँग रूमचे काही काळासाठी सीसीटीव्ही प्रक्षेपण खंडित झाल्याचा प्रकार समोर आला होता. तर बुधवारी नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करत येथील स्ट्राँग रूममध्ये एक व्यक्ती संशयास्पदरीत्या जात असल्याचे सांगितले. त्यामुळे या घटना लक्षात घेता ठाण्यात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी उमेदवारांचे कार्यकर्ते संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

ईव्हीएम मशीनची जबाबदारी तीन दलांच्या खांद्यावर

मतदानानंतर मतमोजणीसाठी 15 दिवसांचा कालावधी असल्याने ईव्हीएम मशीन सुरक्षित राहण्यासाठी स्ट्राँग रूम तयार केले आहे. त्या स्ट्राँगरूमची जबाबदारी 128 केंद्रीय निमलष्करी दल, राज्य राखीव पोलीस दल यांच्यासह स्थानिक पोलीस अशा तीन दलांच्या खांद्यावर आहे.