उजनीत बोट उलटून बुडालेले अद्यापि बेपत्ताच

उजनी धरणपात्रात बोट उलटून बेपत्ता झालेल्या सहाजणांचा अद्यापि शोध लागलेला नाही. मंगळवारी रात्री अंधार असल्याने शोधकार्य थांबले होते. आज सकाळीच ‘एनडीआरएफ’चे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम हाती घेतली. मात्र, अद्यापि कोणाचाच शोध लागला नाही. दरम्यान, मंगळवारी (21 रोजी) बुडालेली बोट 35 फूट खोल पाण्याच्या तळाशी सापडली.

वादळी वाऱयाने मंगळवारी एक प्रवासी बोट उलटली. बोटीतील गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकुळ जाधव (25), शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय 3, सर्व रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), गौरव डोंगरे (वय 16)  आणि बोटचालक अनुराग अवघडे असे सहाजण बेपत्ता झाले आहेत, तर सोलापूर येथील सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे पोहत काठावर आल्याने बचावले.