पावसाळा येणार म्हटलं की धडकीच भरते! सांगलीतील श्यामरावनगरच्या 350 कोटींच्या प्लॅनवर अद्याप कार्यवाही नाही

पावसाळा सुरू होणार म्हटले की, श्यामरावनगर व परिसरातील 50 हजार नागरिकांच्या उरात धडकी भरते. जून महिन्यात पडलेल्या पावसाचे पाणी डिसेंबरपर्यंत निचरा होत नाही. शंभरफुटी रोडच्या दक्षिणेला धामणी रोड ते काळीवाटपर्यंतच्या परिसरात पावसाचे पाणी साचून मोठी तळी निर्माण होतात. श्यामरावनगरचे दैन्य संपविण्यासाठी 350 कोटींचा मास्टर प्लॅन तयार झाला. याला वर्ष झाले तरी अद्यापि यावर कोणतीच अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या वर्षीदेखील श्यामरावनगरांच्या मनात धडकी कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर रोडशेजारी असणारे श्यामरावनगर मुळात बशीच्या आकाराचे असल्याने साठलेले पाणी बारमाही राहते. अनेक भागांत अजूनही रस्ते झालेले नाहीत. पावसाळ्यात चिखल, दलदलीतूनच नागरिकांना मार्ग काढावा लागतो. चिखलामुळे पावसाळ्यात नरकयातना सोसण्याची वेळ नागरिकांवर येते. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सक्षम व्यवस्था नाही. ड्रेनेज व्यवस्थेचे काम अपूर्ण आहे. डुकरे, कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. याबाबत श्यामरावनगरच्या नागरिकांनी थेट पंतप्रधानांच्या पोर्टलवर तक्रार केली होती. तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या भागाकडे लक्ष दिलेले नाही.

पावसाच्या पाण्याचा निचरा, सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने ‘स्मार्ट’ आराखडा करण्याची घोषणा केली. तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांनीही या भागाला भेट देऊन पाहणी केली. प्रश्न सोडविण्यासाठी यंत्रणेला निर्देश दिले. आराखडा तयार करण्यासाठी खासगी कंपनीची नेमणूक केली. या कंपनीकडून सुमारे 800 हेक्टरचे सर्वेक्षण पूर्ण झाले. आराखडाही तयार झाला. नैसर्गिक नाले खुले करणे, भोबे गटार, हरिपूर रोड नाला आदींचा उल्लेख आराखडय़ात झाला. मात्र, नऊ महिने झाले, तरी या आराखडय़ाला ना मंजुरी मिळाली, ना अंमलबजावणी झाली. आराखडा कागदावरच राहिला आहे. आता श्यामरावनगरमधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नूतन आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

खुल्या प्लॉटमुळे अधिक धोकादायक

श्यामरावनगर व परिसरात 300हून अधिक मोकळे प्लॉट्स आहेत. या प्लॉट्समध्ये पाणी साचते. पाणगवत उगवते. त्यामुळे डासांसह साप, विंचू यांसह धोकादायक प्राणी पाचवीलाच पुजले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्याचीही नागरिकांना भीती वाटते. अनेक मालक प्लॉट घेतल्यापासून फिरकले नाहीत. त्यामुळे या परिसरात अधिक धोका निर्माण झाला आहे.