सचिन खिलारीने सुवर्ण पदक राखले; धरमबीरला कांस्य; हिंदुस्थानची डझनभर पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी

हिंदुस्थानच्या गतविजेत्या सचिन खिलारीने जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक एफ-46 गटात आशियाई विक्रमासह सुवर्ण पदक राखले. याचबरोबर धरमबीर यानेही पुरुषांच्या क्लब थ्रो एफ-51 गटात हिंदुस्थानला कांस्य पदक जिंकून दिले. हिंदुस्थानने स्पर्धेत आतापर्यंत 5 सुवर्ण, 4 रौप्य व 3 कांस्य अशी एकूण 12 पदकांची कमाई केली.

हिंदुस्थानची स्पर्धेच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वाधिक पदके असल्याने ही ऐतिहासिक कामगिरी ठरली, हे विशेष. गतवर्षी हिंदुस्थाने 10 पदकांची कमाई केली होती. या स्पर्धेत सध्या चीन 18 सुवर्ण, 16 रौप्य व 14 कांस्य अशा एकूण 48 पदकांची लयलूट करीत अव्वल स्थानी असून, दुसऱया स्थानी असलेल्या ब्राझीलने 17 सुवर्ण, 8 रौप्य व 5 कांस्य अशी एकूण 30 पदकांची कमाई केलीय.

सांगलीच्या मराठमोळय़ा सचिन खिलारीने 16.30 मीटर गोळाफेक करीत स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. त्याने गतवर्षी पॅरिसमधील जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 16.21 मीटर गोळा फेकून विक्रम केला होता. शालेय जीवनात एका रस्ते अपघातात हाताच्या ढोपराचे स्नायू तुटले होते. शस्त्रक्रियेनंतरही ते व्यवस्थित होऊ शकले नाही. मात्र दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड देत सचिनने जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सातासमुद्रापार हिंदुस्थानचा झेंडा फडकविला. धरमबीरने पुरुषांच्या क्लब थ्रो एफ-51 गटात अंतिम फेरीत हळूहळू आपल्या कामगिरीत सुधारणा करीत 33.61 मीटर फेकी करीत पाचव्या प्रयत्नात कांस्य पदकावर आपले नाव कोरले. या गटात सर्बियाच्या जेलिजको दिमित्रिजेविचने 34.20 मीटर थ्रो करत विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले. मेक्सिकोच्या मारियो संताना हर्नांडिजने 33.62 मीटर फेकी करीत रौप्य पदकाला गवसणी घातली.

‘‘मला सुवर्ण यशाच्या पुनरावृत्तीची अपेक्षा होतीच. जेतेपद राखू शकल्याने साहजिकच आनंद झालाय. पॅरिस पॅरालिम्पिकसाठी तर मी आधीच पात्र ठरलोय. आता तेथेही सुवर्ण पदक जिंकण्यासाठी मी जिवाचे रान करीन.’’- सचिन खिलारी