स्वाती मालीवाल प्रकरण – भाजपचं क्रूर राजकारण; आधाराशिवाय चालताही न येणाऱ्या केजरीवालांच्या वयोवृद्ध पालकांच्या चौकशीचा डाव

आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणी दिल्ली पोलीस आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांची चौकशी करण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांचे एक पथक यासाठी त्यांच्या घरी पोहोण्याची शक्यता असून केजरीवाल यांनी स्वत: बुधवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. केजरीवाल यांच्या आई-वडिलांचे वय जवळपास 80-85 असून या वयात त्यांना त्रास दिला जात आहे असा आरोप ‘आप’ने केला आहे.

खासदार संजय सिंह यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचे बाण सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय द्वेषात खालची पातळी गाठली आहे. त्यांनी आधी दिल्ली सरकारमधील मंत्र्यांना आणि त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. आता त्यांनी सर्व मर्यादा सोडत केजरीवाल यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांना पोलिसांच्या मदतीने त्रास देण्याची योजना आखली आहे, असा आरोप संजय सिंह यांनी केला..

केजरीवाल यांचे वयोवृद्ध आई-वडील अन्य व्याधिंनी ग्रस्त आहेत. त्यांना आधाराशिवाय चालताही येत नाही. संपूर्ण देश आणि दिल्ली हा छळ पाहत असून याला उत्तर देईल, असेही ते म्हणाले.

दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही याबाबत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केली आहे. केंद्र सरकारने सर्व प्रतिष्ठा आणि सार्वजनिक आदर नष्ट केला आहे. मुख्यमंत्र्यांना अटक होण्याच्या एक दिवस अगोदर त्यांच्या आई रुग्णालयातून परतल्या होत्या. आता दिल्ली पोलीस त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांची चौकशी करतील. हे अतिशय क्रूर आणि वाईट राजकारण आहे, असे ते म्हणाले.


आज चौकशी होणार नाही

दरम्यान, स्वाती मालीवाल प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांची आज चौकशी होणार होती. मात्र ही चौकशी पुढे ढकलली गेली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांची आज चौकशी होणार नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.