कारवाईची भीती दाखवून दूतावास अधिकाऱयाकडून सात लाख रुपये उकळले

ड्रग्ज आणि मनी लॉण्डरिंगच्या गुह्यात कारवाईची भीती दाखवून ठगाने एका परदेशी दूतावासाच्या अधिकाऱयाकडून सात लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे सांताक्रुझ येथे राहतात. ते एका परदेशी दूतावासात वरिष्ठ पदावर काम करतात. गेल्या आठवडय़ात त्यांना एका व्यक्तीचा पह्न आला. त्याने तो कुरिअर पंपनीतून बोलत असल्याचे भासवले. त्याच्या नावाने तैवान येथे एक पार्सल पाठवण्यात आले होते. त्या पार्सलमध्ये पासपोर्ट, तीन व्रेडिट कार्ड, एमडी ड्रग्ज, लॅपटॉप आणि 35 हजार रुपये होते. ते पार्सल सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहे. त्याचा तपास क्राईम ब्रँचचे पथक करत असल्याचे त्यांना सांगितले.

काही वेळाने त्यांना विक्रम नावाच्या एकाचा पह्न आला.  आधारकार्डचा गैरवापर मोठय़ा प्रमाणात झाला आहे. फसवणुकीसाठी आधारकार्डचा वापर करून एकाने चार विविध बँकेत खाती उघडली आहेत. त्या खात्यांत मोठय़ा प्रमाणात व्यवहार झाले आहेत. त्याची ऑनलाइन चौकशी होणार आहे. त्या चौकशीसाठी स्काईप अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या घटनेने तक्रारदार हे घाबरले. त्यांनी स्काईप अॅप डाऊनलोड केले. प्रोफाईल पाहिले असता ते पोलिसांचे असल्याचे त्यांना वाटले.

ठगाने त्यांना विविध पोलीस यंत्रणांचे पत्र पाठवून कारवाईच्या नावाखाली ठगाने त्यांना विविध बँक खात्यांत पैसे पाठवण्यास सांगितले. कारवाईच्या भीतीपोटी त्यांनी सात लाख रुपये विविध बँक खात्यांत पाठवले. त्यानंतर त्यांना आणखी 25 लाख रुपये पाठवण्यास सांगितले. सतत पैशांची मागणी होत असल्याने त्यांना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेतली.