सरकार आपल्या दारी, चावी देण्याचा फक्त फार्स करी! तळीये दरडग्रस्तांना सरकारने फसवले; अडीच वर्षांत अवघ्या 66 जणांना घरे

>> भारत गोरेगावकर

महाडमधील तळीयेच्या दरडग्रस्तांना सरकारने अक्षरशः फसवले असून अडीच वर्षांत 271 पैकी फक्त 66 जणांना घरे मिळाली आहेत. सरकार आपल्या दारी.. चावी देण्याचा फक्त फार्स करी अशीच स्थिती असून या घरांमध्ये ना पिण्याचे पाणी ना कोणत्याही सोयीसुविधा. त्यामुळे पुनर्वसन होऊनही रहिवाशांचे हाल सुरूच आहेत. मिंधे सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. उर्वरित 205 कुटुंबे तर अजूनही तडे गेलेल्या डोंगराखाली मृत्यूच्या छायेत असून येत्या पावसाळ्यात त्यांच्यापुढे दरड कोसळण्याचे संकट उभे ठाकले आहे. सरकार आमच्या मरणाची वाट पाहात आहे काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

22 जुलै 2021 हा दिवस आठवला तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. याच दिवशी तळीये गावावर भलीमोठी दरड कोसळून 87 जणांना आपले प्राण गमावावे लागले होते. या घटनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. एकीकडे मुसळधार कोसळणारा पाऊस आणि दुसरीकडे मदतकार्यात येणारे अडथळे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. या दरडीखाली कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ तर कुणाची बहीण कायमचे गाडले गेले. या काळ्याकुट्ट घटनेला तीन वर्षे उलटून गेली तरी तळीयेग्रस्तांच्या पोटात पावसाळा जवळ आला की भीतीचा गोळा येतो.

तळीयेची दुर्घटना घडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने भेट देऊन मदतकार्याचे काम हाती घेतले. एवढेच नव्हे तर संपूर्ण गावाचे म्हाडाच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याचाही निर्णय घेतला. त्यासाठी भूसंपादन झाले. घरांची कामेही करण्यात आली. तळीयेच्या सात वाड्यांमधील 271 कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला होता. मात्र सरकार बदलले आणि ही सर्व कामे मंदावली. गेल्या तीन वर्षांत रडतखडत फक्त 66 कुटुंबीयांनाच निवारा मिळाला आहे.

तळीयेग्रस्तांच्या पुनर्वसनाचे श्रेय तत्कालीन सरकारला मिळू नये म्हणून मिंध्यांनी ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम घडवून आणला. त्यात ग्रामस्थांना घरांच्या चाव्या देण्याचा फार्स केला. मात्र उर्वरित 205 कुटुंबांच्या नशिबी फक्त घर घर असून म्हाडाने त्यांची सपशेल फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात सरसकट सर्वांसाठी घरे बांधण्यात येणार होती. त्याचे काय झाले, असा प्रश्न विचारला जात आहे. अनेक कुटुंबे कंटेनर शेडमध्ये असून काहीजण अजूनही जुन्याच घरी दरडीखाली राहात आहेत.

दोन वर्षांत तरी काम होईल का?

सध्या तळीयेग्रस्तांसाठी दुसऱ्या टप्प्यातील घरांची कामे सुरू आहेत. पण हे काम अतिशय कासवगतीने करण्यात येत असून कामगारांची संख्याही खूप कमी आहे. दोनशेहून अधिक घरे उभारण्याचे म्हाडाने नियोजन केले आहे. पण असाच वेग राहिला तर पुढील दोन वर्षांत तरी हे काम पूर्ण होईल का, याबाबत स्थानिकांनी शंका व्यक्त केली आहे.

दुर्दशेचा फेरा सुरूच

तळीयेमध्ये एकूण सात वाड्या असून त्यापैकी फक्त कोंडाळकरवाडीचे पुनर्वसन झाले आहे. ६६ कुटुंबे नवीन वसाहतीमध्ये राहतात. पण त्यांच्या दुर्दशेचा फेरा अजूनही सुरूच असल्याचे दिसून आले आहे. गटारांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून रहिवाशांना पिण्याचे पाणीदेखील सरकार पुरवू शकले नाही. नळपाणी पुरवठा योजना अपूर्ण आहे. टाकी आहे पण त्यात पाणीच नाही. त्यामुळे टँकरचा आसरा घ्यावा लागतो. अनेकदा पिण्याचे पाणी तर विकतच आणावे लागते.

सतत दुरुस्ती करावी लागते

“कंटेनरमधून आम्ही घरांमध्ये आलो. पण अद्यापि पिण्याचे पाणी नाही. ते विकत आणावे लागते. जोराचा पाऊस आला तर दोन्ही बाजूंनी पाणी घरात शिरते. त्यामुळे दरवाजे भिजून खराब होण्याची भीती आहे. अधून मधून दुरुस्तीची कामे करावी लागत आहेत. एकंदरीत घरे मिळाली तरी सोयीसुविधा नसल्याने आमचे हाल होत आहेत.”

नीलिमा पोळ, (ग्रामस्थ)