Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी रायबरेलीच्या आखाडय़ात

काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाडसोबतच अमेठी किंवा रायबरेलीतूनही लढणार का, याचा सस्पेन्स अखेर संपला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी रायबरेलीतून राहुल यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली. त्यानंतर राहुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

रायबरेलीमध्ये राहुल गांधी विरुद्ध भाजपचे दिनेश प्रताप सिंह अशी लढत होईल. उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित होत्या. गेल्या निवडणुकीत सोनिया गांधी रायबरेलीतून लढल्या होत्या तर राहुल गांधी वायनाडसह अमेठीतून लढले होते. अमेठीत प्रथमच राहुल यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

रायबरेलीशी गांधी कुटुंबीयांचे भावनिक नाते

फिरोज गांधींपासून इंदिरा गांधी ते सोनिया गांधी अशा दिग्गजांनी रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले आहे. येथे आतापर्यंत झालेल्या 20 निवडणुकांपैकी काँग्रेसने 17 निवडणुका जिंकल्या आहेत. सोनिया गांधी या 2019मध्ये रायबरेलीतून निवडून आल्या होत्या. मात्र प्रकृतीमुळे त्यांनी या वेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेत रायबरेलीवासीयांना भावनिक पत्रही लिहिले होते. मी यंदा निवडणूक लढवत नसले तरी सदैव तुमच्यासोबत आहे. मला जसा जिव्हाळा आणि आपुलकी दाखवलीत तशीच आपुलकी, स्नेह आमच्या कुटुंबातील सदस्यांना दाखवा, असे या पत्रात लिहीत सोनिया यांनी रायबरेलीतून गांधी कुटुंबीयांपैकीच कुणी तरी निवडणूक आखाडय़ात उतरेल याचे संकेत दिले होते. येथून प्रियांका लढतील अशी अटकळ होती, मात्र ऐन वेळी राहुल यांना आखाडय़ात उतरवण्यात आले.

दरम्यान, गांधी कुटुंबीयांचे विश्वासू किशोरीलाल शर्मा अमेठीतून लढणार आहेत. त्यांनीही आज अर्ज भरला.किशोरीलाल यांनी आजवर काँग्रेस आणि गांधी कुटुंबासाठी खासदार प्रतिनिधी म्हणून या मतदारसंघातील व्यवस्था आणि यंत्रणा सांभाळली आहे.