
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना आयआरसीटीसी घोटाळ्यात अडकवण्याचा कट सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना आणि पंतप्रधान कार्यालयानेच रचला होता असा खळबळजनक गौप्यस्फोट सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआय संचालक आलोक वर्मा यांनी केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) दिलेल्या आपल्या शपथपत्रात केला आहे. या कटात भाजप नेते सुशील मोदीही सामील असल्याचा आरोप वर्मा यांनी केला आहे.
सीव्हीसीने न्यायालयाला अहवाल सादर केल्यांनतर शपथपत्र आयोगाने वर्मा यांच्याशी शेअर करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. ‘वायर’ने दिलेल्या वृत्तानुसार वर्मा यांनी लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्धच्या घोटाळा प्रकरणाचा तपास जाणूनबुजून कमजोर केला. हा राकेश अस्थाना यांचा आरोप फेटाळून लावताना आलोक वर्मा यांनी म्हटल आहे की, अस्थाना यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार राजकीय हेतूने प्रेरीत होऊन लालूप्रसाद यांना आयआरसीटीसी घोटाळ्यात चांगलेच अडकवण्याच्या कटाला आकार दिला. अस्थाना हे सतत सुशील मोदींच्या आणि पीएमओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते, असेही वर्मा यांनी स्पष्ट केले.
नितीशकुमारांनाही कटाची माहिती होती
सीबीआय आणि पीएमओ कार्यालयाने लालूप्रसाद यादव यांना आयआरसीटीसी घाटाळाप्रकरणी अडकवण्याचे निश्चित केले होते या कटाची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाही होती असेही वर्मा यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.
लालूंची प्रकृती बिघडली
रांची : चारा घोटाळाप्रकरणी रांचीच्या तुरुंगात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असून त्यांच्या उजव्या पायाच्या घोट्याला जखमही झाली आहे. त्यामुळे ते उठून फिरूही शकत नाहीत. त्यांना उपचारासाठी रांचीमधील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

























































