अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात सात रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय अशी ख्याती असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बुधवारी दुपारी दीड तासांत सात रुग्णांचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने जास्त वयाचे तसेच गंभीर आजाराचे रुग्ण दगावल्याचे कारण पुढे करून सारवासारव करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न केल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यावर कहर म्हणजे, ऑण्टिजेन चाचणी करून लगोलग मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातलगांच्या हवाली करण्यात आल्याने रुग्णालय प्रशासनाभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे.

अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणावर रुग्ण येतात. सध्या पंचक्रोशीच्या कानाकोपऱयातून कोरोनाबाधितांचा स्वारातीकडे ओघ लागला आहे. मात्र बुधवारी स्वारातीच्या नावाला काळिमा लावणारी घटना घडली. बुधवारी दुपारी वॉर्ड क्रमांक 1 व वॉर्ड क्रमांक 3 मध्ये ऑक्सिजनअभावी सात रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला.

ऑक्सिजन मिळालाच नाही

आज सकाळपासूनच रुग्णालयात ऑक्सिजनची चणचण भासत होती. मात्र प्रशासनाने ऑक्सिजन मिळवण्यासाठी तत्परता दाखवली नाही. दुपारी 12 वाजल्यानंतर कोरोना वॉर्डात हलकल्लोळ उडाला. तेव्हा प्रशासनाने धावपळ केली; परंतु तोपर्यंत ऑक्सिजनअभावी सात रुग्णांनी प्राण सोडले होते. रुग्णांच्या नातलगांनी आरडाओरड केली, विनवण्या केल्या. अधिष्ठातांना पह्न केले. परंतु काहीही उपयोग झाला नाही. ऑक्सिजनअभावीच हे मृत्यू झाल्याचा स्पष्ट आरोप नातलगांनी केला आहे.

आरटीपीसीआर चाचण्या का केल्या नाहीत?

कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यास आरटीपीसीआर चाचणी करून निगेटिव्ह अहवाल आल्यास मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला जातो. मात्र आज स्वाराती रुग्णालय प्रशासनाने मृतदेहांच्या ऑण्टिजेन चाचण्या करून लगोलग मृतदेह नातलगांच्या हवाली केल्याने संशय निर्माण झाला आहे.

स्वाराती रुग्णालयात दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतांश मृत्यू हे जास्त वयाचे तसेच अस्थमा, उच्च रक्तदाब तसेच हायपर टेन्शन यामुळे झाले आहेत. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची अफवा आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन व्यवस्था उत्तम आहे. – डॉ. शिवाजी सुव्रे, अधिष्ठाता

घटनेची माहिती समजताच शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी रुग्णालयात धाव घेतली. कोरोना कक्षात जाऊन परिस्थितीची पाहणी करून माहिती घेतली. रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांना दिलासा दिला. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनीही भेट देऊन माहिती घेतली, अधिकाऱयांशी चर्चा केली.