
वाईन बनवणाऱ्या एका कंपनीने नोकरीसाठी विशेष ऑफर दिली आहे. कपंनीने ऑफर केलेली नोकरी करणाऱ्याला राहण्यासाठी मोफत घरही दिले जाणार आहे. या नोकरीचा कार्यकाळ वर्षभराचा असेल. तसेच या वाईन फॅक्टरीत आवडीचे काम करता येणार आहे. आपल्या आवडीचे काम करण्यासाठी ही कंपनी महिन्याला 7 लाख 24 हजार रुपयांचा पगारही देणार आहे.
ही विशेष नोकरीची ऑफर देणारी कंपनी अमेरिकेतील आहे. कंपनीचे नाव Murphy-Goode Winery आहे. कंपनीने कॅलिफोर्नियामधील सोनोमा येथील आपल्या फॅक्टरीसाठी या नोकरीची ऑफर कंपनीने दिली आहे. ही नोकरी मिळणारी व्यक्ती या कंपनीत वायनरीशी संबंधित आपल्या आवडीचे काम करू शकणार आहे. ‘सीएनएन’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ही नोकरी करणाऱ्या व्यक्तीला स्वतःचे कसब सिद्ध करण्याची संधी मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सुरुवातीच्या काळात नोकरी करणाऱ्याला वायनरीतील विविध कामे करून ती शिकावी लागतील. या सर्व कामांची माहिती झाल्यावर आवडीचे आणि स्वतःची क्षमता सिद्ध करता येईल, असे काम करण्याची संधी नोकरी करणाऱ्याला मिळणार आहे.
ही नोकरी करणाऱ्याला वायनरीशी संबंधित सर्व कामांची माहिती मिळवावी लागेल. तसेच ई कॉमर्सबाबतची माहिती असणेही गरजेचे आहे. तसेच कंपनीतील विविध गटांशी संपर्क साधत समन्वयाने काम करावे लागणार आहे. ही कंपनी 1985 मध्ये स्थापन करण्यात आली होती. तसेच कंपनीने 2009 मध्ये पहिल्यांदा नोकरीसाठी अशी विशेष ऑफर जाहीर केली होती.
आता कंपनीचे काम सोशल मिडीयापर्यंत पोहचवण्यासाठी आणि कंपनीसमोरील आव्हानांचा विचार करता कंपनीने पुन्हा अशी ऑफर जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांचे वय 21 वर्षांच्या पुढे असावे. तसेच अमेरिकेत काम करण्याच्या परवानाही व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे. ही नोकरी का करायची आहे, याचे कारणही उमेदवाराला पाठवायचे आहे. यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. सध्या सोशल मिडीयावर या जॉबच्या ऑफरची चर्चा सुरू आहे.






























































