
>> अरूण
अनेक पक्ष्यांची, क्वचितच प्राण्यांचीही अंडी आपण पाहिलेली असतात. काहींनी तर कधीकाळी हिंदुस्थानात असणाऱया डायनोसॉरचं महाकाय अंडं अहमदाबादच्या ‘पीआरएल’मध्ये पाहिलंय. एरवी कोंबडीची अंडी नित्याच्या आहारातली. चिमणी, कावळा, कबूतर वगैरे पक्ष्याच्या पांढऱया अंडय़ामध्येही ‘ऑफ व्हाइट’ अथवा थोडय़ा वेगळ्या छटा दिसतात. शहामृगाची, इमू पक्ष्याची अंडीसुद्धा प्राणिसंग्रहालयात दिसू शकतात.
मोर हा मुख्यत्वे भूमीवरच वावरणारा सर्वांगसुंदर, रंगीत पक्षी. पण त्याची अंडी मात्र रंगीत नसतात. बहुतेक पक्ष्यांच्या अंडय़ांचं पिग्मेंट किंवा रंगछटा सफेद किंवा शुभ्रच असते. सॅविन नावाचा पक्षी त्याला अपवाद म्हटला पाहिजे. त्यातही जगातल्या सर्वच रॉबिन माद्या (निळी) अंडी घालत नाहीत. अमेरिकन रॉबिन प्रजातीत अशी अंडी दिसून येतात.
अमेरिकन रॉबिन हा अमेरिकेच्या उत्तर भागात आढळणारा आणि गाणारा पक्षी आहे. त्यांची अंडी निळ्या रंगछटेची असतात. ती हिमोग्लोबिन बदलामुळे तशी होतात. अशा विशिष्ट प्रजातीच्या निळ्या रंगाच्या अंडय़ांची माहिती चीनमध्ये 1772 पासून होतीच, परंतु रंगछटांमध्ये ‘रॉबिन एग ब्लू’ या रंगाची नोंद 1873 च्या सुमारास झाली.
यामागचं विज्ञान असं की, निळ्या रॉबिनच्या रक्तातील हिमोग्लोबिनमधल्या ‘हेम’ म्हणजे लोहतत्त्वाच्या संयुगात (मॉलेक्युल) बदल होऊन अंडय़ांच्या कवचाला निळी किंवा हिरवट-निळी रंगछटा येते. हा बदल (ब्रेकडाऊन) घडताना बिलिव्हर्डिन या हिरव्या रंगाच्या पित्तकर्णाची निर्मिती होते.
याच पद्धतीने अनेक पक्ष्यांची अंडी विविधरंगी घडतात. कॅसोवेरी पक्षी पाचूच्या रंगाची चकचकीत अंडी देतात. इमूची अंडी कधी ठिपकेदार तर हिरवट, निळसर रंगछटांची असतात. ग्रीन हेरॉन पक्षी निळसर-हिरवी अंडी घालतात. अशी ही विविध पक्ष्यांच्या अंडय़ांची कथा. त्यात ‘रॉबिन एग ब्लू’ची चर्चा जास्त झाल्याने तो विषय मध्यवर्ती ठेवला इतकंच.
माणसांच्याही हवामानानुसार विविध रंगछटा असतातच, परंतु त्याला काहीएक मर्यादा असते. माणसांची त्वचा कधी रंगद्रव्यात बदल घडून निसर्गात इतरत्र आढळणाऱया दाट रंगछटांची असत नाही. फुला-पानांचे, पक्ष्यांचे त्यातही फुलपाखरांचे रंग कितीतरी विलोभनीय दिसतात. निसर्गाने सप्तरंगांची, इंद्रधनुषी उधळण एकटय़ा मोरावर सर्वाधिक केलेली आढळते. त्यांची अंडी मात्र शुभ्र पांढरीच असतात.





























































