
महायुती सरकारने कोट्यवधीची बिले थकवल्याने आणि सरकारदरबारी हेलपाटे घालूनही ते हक्काचे पैसे मिळत नसल्याने निराश होऊन अमरावतीमधील तरुण कंत्राटदार सुनील वागदरे यांनी आपल्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. राज्यात आतापर्यंत 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या असून सरकार त्याची काहीच दखल घेत नसल्याने कंत्राटदार संघटनांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
43 वर्षीय सुनील वागदरे हे अमरावती येथील वरुड तालुक्यातील मौजे जरूड येथील रहिवासी होते. शासकीय मान्यताप्राप्त कंत्राटदार असलेले वागदरे यांनी सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास आणि आदिवासी विभागाची कामे केली होती. त्या कामांची अडीच कोटी रुपयांची बिले या विभागांमध्ये थकीत होती. थकीत बिलांचे पैसे मिळावेत म्हणून ते गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मुंबईत हेलपाटे घालत होते. संबंधित अधिकाऱ्यांच्या अनेकदा भेटीही घेतल्या. दरम्यान त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनल्याने कुटुंबाची उपासमार होऊ लागली होती. पत्नी आणि दोन मुलांच्या काळजीने त्यांची प्रकृतीही खालावू लागली होती. अखेर प्रचंड नैराश्य आल्याने त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. वागदरे यांच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सरकार आणखी किती बळी घेणार? कंत्राटदार संघटनांचा सवाल
सुनील वागदरे यांच्या आत्महत्येला संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेने केला आहे. थकीत बिले मिळावीत म्हणून कंत्राटदारांनी आमरण उपोषण, आंदोलन, रस्ता रोको, मोर्चे काढले तरी सरकारने या संघटनांच्या शिष्टमंडळाबरोबर साधी बैठकही घेतलेली नाही, सरकार आणखी किती कंत्राटदारांचा बळी घेणार असा सवाल या संघटनांचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी शनिवारी सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली आहे.





























































