
एस.एम.पाटील । परळी-वैजनाथ
परळी-वैजनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनिमंदिरात रविवारी रात्री एका महिन्याचे पुरुष अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली. हे अर्भक शनिमंदिराच्या दान पेटीजवळ आढळले. याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच परळी शहर पोलीस स्टेशनचे डी.एस.बी. समाधान भाजीभाकरे यांनी त्या अर्भकाला आपल्या ताब्यात घेतले.
थंडीचे दिवस असल्याने त्यांनी त्या अर्भकाला तात्काळ शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी सकाळी समाधान भाजीभाकरे यांनी त्या बाळाला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. दरम्यान शनिमंदीरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता त्या अर्भकाला एका महिलेने आणून ठेवल्याचे दिसले. मात्र त्या महिलेची ओळख पटू शकलेली नाही, अशी माहिती परळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी.के.शेळके यांनी सांगितले. भर थंडीचे दिवस असताना आपल्या आईने एका महिनाच्या बाळाला मंदिरात का टाकले असावे, अशी चर्चा होत आहे.






























































