
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. लचके तोडलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पेटवण्याचे मोठे आव्हान आता खेड पोलिसांसमोर आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी त्या इसमाचा मृत्यू झाला असावा असा प्राथिमक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात हा मृतदेह आढळून आला. खेड पोलिसाना याबाबत माहिती मिळताच खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद, खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव या तात्कळ घटनास्थळी दाखल झाल्या. परशुराम घाटात आढळून आलेल्या मृतदेहाजवळ ओळख पटेल असा कोणतंच पुरावा न आढळून आल्याने हा मृतदेह नेमका कुणाचा, त्यांचा मृत्यू अपघाती, की घातपाती याबाबत काहीच खुलासा होऊ शकला नाही.
परशुराम घाटात रस्त्याच्या कडेला जो मृतदेह आढळून आला त्या इसमाचा सुमारे महिनाभरापूर्वी मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. जंगली श्वापदांनी मृतदेहाचे लचके तोडले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.





























































