ग्रामपंचायतीच्या धोकादायक कार्यालयात अंगणवाडीचे वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, धुळे

जीर्ण झालेल्या खोलीतून अंगणवाडी स्थलांतरित झाली ती ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयात. परंतु ग्रामपंचायतीचे जुणे कार्यालयदेखील जीर्ण झाले आहे. या कार्यालयाचा स्लॅबचा काही भाग कोसळला आहे. अशा स्लॅबखाली पाच वर्षे वयापर्यंतची बालके अंगणवाडीत येऊन शिक्षणाच्या प्रवाहात येऊ पाहत आहेत. परंतु दुर्दैवाने काही घडले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

ग्रामीण भागातील मुलांना आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व कळावे, मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनाने अंगणवाडय़ांच्या माध्यमातून शिक्षण देऊ केले आहे. अंगणवाडीत मुलांना खाऊ देत पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या शिक्षणामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडतो आणि पालकांनाही मुले शाळेत जावीत असे वाटू लागते. परंतु शिक्षणाच्या पायाभूत सुविधा देण्यात आता शासकीय यंत्रणा कमी पडू लागली आहे. धुळे तालुक्यातील कुंडाणे-वरखेडे येथे दोन अंगणवाडय़ा आहेत. परंतु अंगणवाडी ज्या खोलीत भरत असे ती खोली पूर्णपणे जीर्ण झाली. भिंतींना तडे गेले. धोकेदायक परिस्थितीमुळे या वर्ग खोलीतील अंगणवाडी ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयात स्थलांतरित करण्यात आली.

या जीर्ण कार्यालयात दोन अंगणवाडय़ा भरविल्या जातात. सुमारे 25 ते 30 विद्यार्थी अंगणवाडीत पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. परंतु मुले ज्या वर्गात बसतात त्याचे छत जीर्ण झाले आहे. स्लॅबचा अनेक भाग कोसळलेला आहे. सिमेंटचा काही भाग कोसळल्याने स्टील उघडय़ावर आले आहे. जीर्ण स्लॅब कोसळून दुर्घटना घडू शकते. मुलांबरोबरच अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या जिवावर बेतू शकते. शिक्षण विभागाने या परिस्थितीची दखल घ्यावी आणि सुसज्ज वर्गखोली अगंणवाडय़ांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे.