जरा हटके : नृत्यातून गायनाकडे

>> अंकिता मोहिते

लहानपणी प्रत्येकाचं वेगळंच जग असतं. कुणाचे विचार काय असतात, तर कुणाचे काय… प्रत्येकालाच आपल्या आवडीनुसार करीयर निवडता येतं असं नाही. पण माझ्या पसंतीचं करीयर मी निवडलं ते माझ्या गायनाच्या छंदातून… लहानपणापासून कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला अभिनेता बनायची हौस असते. पण मला तेव्हा नृत्याचं वेड होतं. लहान होते तेव्हा अभ्यासातून जरासा मोकळा वेळ मिळाला की मी नाचायचे, बागडायचे… माझ्या विश्वात मी रमून जायचे. आईने माझी नृत्याची ही आवड पाहिली आणि मला नृत्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायला पाठवलं. ही झाली माझी नृत्याची आवड आणि नाचण्याचं वेड… पण म्हणतात ना आयुष्यात आपल्याला जसं हवं तसंच घडत नसतं… काही गोष्टी आपल्या भल्यासाठी असतात. मला वाटलंही नव्हतं की पुढे जाऊन मी गायिका होईन म्हणून…

त्याचं झालं असं की, माझे बाबा उत्तम भजनीबुवा.  एकदा ते गात असताना मी त्यांच्या तालात ताल धरून गात होते. आई-बाबांनी ते ऐकलं तेव्हा खूषच झाले. मी गाण्याचं शिक्षण घ्यावं असं त्यांना वाटू लागलं. मग काय… वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनी मला संगीत शिक्षक मोहनदास ढेकळे गुरुजींकडे शिकायला पाठवलं. आज बारा वर्ष झाली मी त्यांच्याकडे शिकतेय. काही वर्षांपूर्वी मला वाटलं होतं की, आईबाबांनी माझं स्वप्न नर्तिका व्हायचं स्वप्न मोडलं, पण त्यांचं स्वप्न मी जगतेय याचा एक वेगळाच आनंद आता वाटतोय. गुरुजींसोबत आतापर्यंत गायनाचे बरेच कार्यक्रम केले आणि अजूनही करत आहे. पाचवीला असताना सह्याद्री चॅनेलकरील ‘वा रे वा’ या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी ज्यांनी माझी ऑडिशन घेतली ते म्हणाले बाळ मोठी झालीस ना या क्षेत्रात मला विसरू नकोस. फार आनंद झाला मला ते एकून… आता अलीकडेच ‘झिंग झिंग झिंगाट’ या झी मराठीवरील कार्यक्रमाचे भाग घेतला होता. शेवटी एकच सांगेन… मला आयुष्याच्या अखेरपर्यंत संगीत शिकायचंय. त्या ऑडिशन घेणार्‍या काकांचं बोलणं खरं करून दाखवायचं आहे. एक खूप मोठी कलाकार व्हायचंय.

आपली प्रतिक्रिया द्या