
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
वयाची साठी उलटल्यानंतरही तरुण दिसणारे अभिनेते अनिल कपूर सध्या खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहेत. त्यांना कॅल्सीफिकेशन ऑफ शोल्डर हा आजार झाला असून एप्रिलमध्ये उपचारासाठी ते जर्मनीला जाणार आहेत. आगामी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अनिल सध्या खूप बिझी आहेत.एका मुलाखतीत अनिलने त्यांच्या आजाराविषयी माहिती दिली. मागील दोन वर्षांपासून त्यांच्या डाव्या खांद्यात कॅल्शिअम जमा होत आहे. जर्मनीतील डॉ. मुलर वॉल्फहार्ट हे अनिल यांच्या खांद्यावर उपचार करणार आहेत.15 वर्षांपूर्वी डॉ. मुलर यांनी अनिल यांच्यावर टेंडिनिटिस नावाच्या आजारासाठी उपचार केले होते. या आजारात शरीरातील हाडे आणि पेशी एकमेकांना चिकटून राहतात. ज्यामुळे असह्य वेदना होतात. उत्साहाच्या भरात चित्रपटात स्वतःच स्टंट केल्याने खांदा दुखावल्याचे अनिल यांनी म्हटले.



























































