केडगांवकर मतदानांच्या माध्यमातून परिवर्तन घडवितील – अनिल राठोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहराबरोबरच उपनगरांचा तसेच प्रामुख्याने केडगांव सारख्या भागाचा शिवसेनेच्या काळात जास्त विकास झाला आहे. या भागातील नगरसेवक दिलीप सातपुते यांनी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. फेज – 2 सारखी पाणी योजना, आरोग्य उपकेंद्र असे एक नव्हे तर अनेक योजना या केडगांवमध्ये आल्या आहेत. या माध्यमातून केडगांवचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय शिवसेना आता शांत बसणार नाही. केडगांवच्या विकासासाठी आपले एक मत महत्वाची भूमिका बजावून परिवर्तन घडवेल, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

केडगांव येथील प्रभाग क्र.16 व 17 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित चौक सभेत शिवसेना उपनेते अनिल राठोड बोलत होते. याप्रसंगी खा.सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, उमेदवार दिलीप सातपुते, विजय पठारे, अमोल येवले, सुनिता कोतकर, शांताबाई शिंदे, सुभाष कांबळे, मोहिनी लोंढे, मनिषा कारखेले आदींसह महिला व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

पुढे बोलतांना उपनेते अनिल राठोड म्हणाले, केडगांव उपनगरात वसाहती वाढत आहेत. या वसाहतींना अजुनही मुलभूत सुविधा नाहीत. नागरिकांचे प्रश्न वाढत आहेत. परंतु याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे आता नागरिकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन केडगांवच्या विकासास चालना मिळून द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी खा.सदाशिव लोखंडे म्हणाले, केंद्र सरकारच्या शहर विकासाच्या अनेक योजना आहेत, परंतु या योजनांचे योग्य ते प्रस्ताव दिल्यास व पाठपुरवा केल्यास नगरला मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो. त्यासाठी आपणही केंद्र सरकारकडे प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले, आपण गेल्या पाच वर्षात प्रभागाच्या विकासाबरोबरच केडगांव परिसराचा विचार करुन अनेक योजना या भागात आणल्या आहेत. पाण्याची लाईन, स्ट्रीट लाईट, उद्याने आदिंसह केडगांव भागात आरोग्य उपकेंद्र सुरु केले. त्यामुळे या विकास कामांच्या जोरावर केडगांवमधील नागरिक शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन केडगांवच्या विकासास हातभार लावतील, असा विश्वास आहे.

या प्रचार फेरीचा शुभारंभ केडगांव वेस येथून नारळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर विविध भागातून ढोल-ताशांच्या गजरात मतदारांना अभिवादन करत ही प्रचार फेरी शाहूनगर चौकात सभेने सांगता करण्यात आली.