कट्टरता सोडा, धर्मनिरपेक्ष व्हा; लष्करप्रमुखांनी टोचले पाकिस्तानचे कान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, अशा कडक शब्दात पुन्हा एकदा हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. ‘पाकिस्तान हा एक कट्टरपंथीय मुसलमान देश बनला आहे. पाकिस्तानला जर हिंदुस्थानसोबत संबंध सुधारायचे असले तर त्यांना धर्मनिरपेक्ष बनावे लागेल. हिंदुस्थान हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि त्यांची (पाकिस्तान) इच्छा असेल तर ते आमच्यासारखे बनू शकतात. त्यावेळी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल’, असेही रावत म्हणाले.

जगभरातमध्ये पाकिस्तानची ओळख एक कट्टर मुसलमान देश अशीच आहे. त्यातच दहशतवाद्यांना दिलेले मोकळे रान आणि हिंदुस्थानसोबत सीमेवर सतत तणाव निर्माण करण्यासाठी होणारा गोळीबार यामुळे पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. पंतप्रधान इम्रान खान यांचे नव्याने स्थापन झालेल्या सरकार आल्यानंतर यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता होती, परंतु हाफिज सईदसारख्या दहशतवाद्याच्या संघटनेवरील बंदी उठवत इम्रान खान यांनीही आधीच्याच सरकारचा कित्ता गिरवला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतेच करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी हिंदुस्थानसोबतचे संबंध सुधारण्यावर जोर दिला. याला उत्तर देताना रावत यांनी दहशतवाद आणि चर्चा एकत्र होणार नाही अशी तंबी दिली.

याआधी तारपूर साहिब कॉरिडॉरच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, ‘हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये फक्त कश्मीरवरून वाद आहे. लोकं चंद्रावर पोहोचले आहेत, परंतु आम्ही आजही तिथेच अडकलो आहोत.’ हिंदुस्थानने मैत्रीसाठी एक पाऊल पुढे टाकले तर पाकिस्तान दोन पाऊल पुढे येईल असेही ते म्हणाले होते.

इम्रान खान यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना जनरल रावत म्हणाले की, ‘पाकिस्तान म्हणतोय की हिंदुस्थानने एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन पाऊल पुढे टाकू. परंतु हे वक्तव्यच अंतर्विरोधी आहे. पाकिस्तानकडून एक पाऊल सकारात्मक पडले तर त्याचा प्रभाव हिंदुस्थानमध्येही तात्काळ दिसून येईल. त्यानंतर चर्चा पुढे सुरू होऊ शकते.’