लष्करच आता दहशतवाद्यांचे मृतदेह अज्ञातस्थळी गाडणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह यापुढे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार नाहीत. लष्कराकडून मृतदेहांचे दफन अज्ञातस्थळी करण्यात येणार आहे. दहशतवाद्यांच्या ‘जनाजा’वेळी गर्दी होते. त्यात देशद्रोही, भडकाऊ भाषणे होऊन कश्मीर खोऱयात दगडफेक, हिंसाचार भडकतो. याला आळा घालण्यासाठी लष्कराने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

दहशतवाद्यांच्या जनाजाला (अंत्ययात्रा) आळा घालण्याची मागणी यापूर्वी अनेकदा सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत होती. त्यावर आता निर्णय झाला असून गृहमंत्रालयाने ऍडवायझरी काढल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

अनेकदा व्हिडीओ व्हायरल
– जम्मू-कश्मीरात लश्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन, जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या दहशतवांद्याचा खात्मा झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातात. यावेळी अंत्ययात्रेला मोठी गर्दी केली जाते. पाकिस्तान, इसिसचे झेंडा फडकवीत देशद्रोही घोषणा दिल्या जातात.
– या जनाजावेळी मोस्ट वाँटेड दहशतवादी सामील होतात आणि हातात बंदुका घेऊन भडकावू भाषणे देतात. या भाषणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा प्रसारित झाले आहेत. कश्मीर खोऱयातील तरुणांची माथी भडकविणारे हे व्हिडीओ आहेत. तरुणांना दहशतवादी तयार करण्यासाठी व्हिडीओंचा वापर केला जातो.
– कश्मीर खोऱयात जनाजानंतर अनेकदा दगडफेक होऊन हिंसाचार भडकला आहे.
– यापुढे लष्कराकडूनच दहशतवाद्यांच्या मृतदेहांचे दफन केले जाणार आहे. अज्ञातस्थळी दहशतवाद्यांचा मृतदेह गाडणार आहेत.

पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या जनाजावर यापूर्वीच बंदी
एन्काऊंटरमध्ये कंठस्नान घातलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या जनाजावर लष्कराने यापूर्वीच रोख लावली आहे. दहशतवाद्याचे मृतदेह अज्ञातस्थळी पुरण्यात येतात. आता कश्मीर खोऱयातील दहशतवाद्यांनाही असेच गाडले जाणार आहे.