आरोग्य सेविकांचे आंदोलन सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

आरोग्य सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोग्य सेविकांनी सोमवारपासून बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आझाद मैदानावर आरोग्य सेविकांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने मुंबईकरांच्या आरोग्य सेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

4 ऑगस्ट 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु 5 महिन्यांनंतरही आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. उलट केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांपासून लोकसंख्या, पशू गणना, निवडणुकांची कामे सेविकांना दिली जातात. प्रशासनाच्या या अन्यायकारक भूमिकेविरोधात हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, न्याय मिळत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.