
>> आरती देवगावकर
दिल्लीत खूप काही खाण्यासारखे, अनुभवण्यासारखे आहे. दिल्ली भटकायची म्हणजेच दिल्ली स्पेशल खादाडी करायची. त्याशिवाय दिल्लीतल्या पायपिटीला अर्थ नाही. अशा पुरानी दिल्लीतील शाही तुकडा, छोले भटुरेंपासून मिल्क केकपर्यंत केलेली ही खाद्यभ्रमंती…
आता थंडी पडली आणि अनाहूतपणे मागच्या वर्षी याच दिवसांत केलेल्या दिल्ली-हिमाचल प्रदेश सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या. कोरोनाच्या दोन वर्षांच्या अघोषित बंदिवासानंतर जरा घाबरत घाबरतच आम्ही प्रवासाला बाहेर पडलो होतो. जायचे होते हिमाचल प्रदेशात महिनाभराच्या वास्तव्याला, पण तिथे जायच्या आधी जरा थंडीची सवय आणि आजवर न पाहिलेली दिल्ली भटकायची आणि दिल्ली स्पेशल खादाडी करायची असा द्वि-कलमी कार्यक्रम होता. ठरल्याप्रमाणे पुण्याहून विमानाने दिल्लीत पोहोचलो. विमानतळावरून मेट्रो पकडून शहरात गेलो. हॉटेलच्या खोलीवर सामान टाकले, फ्रेश झालो आणि खाण्यासाठी बाहेर पडलो. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या समोरच्या बाजूला असलेल्या राधेश्याम छोलेवाल्याकडे गेलो. ते फार प्रसिद्ध आहेत.
संध्याकाळी आम्ही गेलो तेव्हा छोले संपले होते. जेमतेम पावणे सात वाजता आले होते, तर त्यांचे हॉटेल धुऊन झाले होते. कामगार बाहेर पडत होते. हे पाहून मला पुण्यातील एका प्रसिद्ध वडेवाल्यांची आठवण झाली. आम्ही ठरावीकच माल बनवतो, तो संपला की संपला. गर्दी आहे, लोक येतायत म्हणून जास्त बनवणे वगैरे भानगड नाही. हा तत्त्वाचा मुद्दा सोडला तर चव मात्र खरंच अप्रतिम! आदल्या दिवशीचा अनुभव जमेस धरून दुसऱया दिवशी आवरून सकाळी नऊच्या सुमाराला बाहेर पडलो. पहिला मोर्चा वळवला तो फेमस छोले भटुरे खायला. उत्तम चवीचे छोले आणि आत पनीर भरलेले भटुरे खाऊन जीव तृप्त झाला. इथे बसायची सोय नाही. यायचे, पैसे भरून टोकन घ्यायचे, ते देऊन प्लेट घ्यायची आणि उभ्याने खाऊन निघायचे. कामाला निघालेली कितीतरी माणसे इथे येऊन उदरभरण करतात.
पहिल्याच घासाला अशी माशी शिंकली म्हटल्यावर ‘आता काय’ असा प्रश्न मला पडलाच, पण आमचे चिरंजीव होते ना बरोबर, ‘सगळय़ा प्रॉब्लेम्सवर सोल्युशन असते’ म्हणणारे. आम्ही मोर्चा वळवला मोती महलकडे. हिंदुस्थान म्हटले की, जगभरातील खवय्यांना बटर चिकन आठवते. जगात सगळय़ात पहिल्यांदा ज्याने बटर चिकन बनवले, त्या मुघल खानसाम्याने तयार केलेली पारंपरिक रेसिपी वापरूनच आजही त्यांचे वंशज इथे स्वयंपाक करतात. खरोखरचे शाही खाणे कशाला म्हणावे ते पाहायचे असेल, तर किमान एकदा तरी मोती महलला भेट द्यावीच. चक्क्यासारख्या गोड सायीच्या दह्यात अनेक मसाल्यांबरोबर मुरवत ठेवलेले चिकन केशराच्या, जायपत्रीच्या सुगंधासह समोर येते. तेव्हा त्या गंधाने, डिशच्या दर्शनाने पोट भरलेले असले तरी नव्याने भूक लागल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे. इथे मोजकेच पदार्थ मिळतात, पण जे मिळतात ते खरोखरच लाजवाब असतात. तिथे पोटभर खाल्ले.
एवढे चमचमीत खाऊन झाल्यावर काहीतरी गोड हवेच असे वाटत होते, पण तिथे असलेले पदार्थ काही आवडीचे वाटत नव्हते. मात्र गोड खायची इच्छा इतकी तीव्र होती की, बहुधा ती वैश्विक शक्तीशी जोडली गेली. बाहेर पडलो आणि समोर लक्ष गेले तर एक ठेला, रबडी आणि शाही तुकडा विकणारा. आमच्या पायांनी आपोआप आम्हाला तिकडे ओढून नेले. शाही तुकडा आणि रबडी यांचा आस्वाद घेताना आताच आपण पोटभर जेवण जेवलोय याचाही विसर पडला. ‘अफलातून’ एवढेच त्या चवीला म्हणता येईल. उगाच नाही तिथे रस्त्यावर असलेल्या ठिकाणी खायला मोठमोठय़ा गाडय़ांमधून चकचकीत माणसे येतात. रस्त्यावर उभे राहून खाताना सगळय़ांची ब्रह्मानंदी टाळी लागलेली. शेजारीच असलेल्या पानाच्या टपरीवरही अनेक गाडीवाले हजेरी लावत होते. पोटाला रबडीची पूर्णाहुती दिल्यावर शेजारच्या टपरीकडे दुर्लक्ष करत आम्ही परत फिरलो (तसे निर्व्यसनीच ना) हॉटेलवर येऊन ताणून दिली.
सकाळी लवकर उठून फिरायला जायचे आहे, असे ठरल्यामुळे झोप आवश्यक होती. दिल्लीच्या कुडकुडत्या थंडीत खरे तर अंगावरचे पांघरूणही काढावेसे वाटत नव्हते, पण फिरायला जायचे ठरवले तर ठरवले. मग मागे हटणे नाही, त्यामुळे भल्या पहाटे उठून सगळे आवरून सात वाजताच आम्ही हॉटेलबाहेर पडलो. सगळे शहर धुक्याची शाल ओढून निवांत गुरफटून झोपले होते. आमच्या हॉटेलमध्ये तर एवढय़ा सकाळी चहासुद्धा उपलब्ध नव्हता. पुढे येऊन कोपऱयावरती एका हातगाडीवर एक काका चहा विकत होते. त्यांच्याकडून घेतलेल्या गरमागरम चहाची आहुती नवऱयाच्या आणि लेकाच्या पोटात गेली तेव्हा त्यांना जरा ऊब आली. त्यांच्या गाडीवर काचेच्या बरण्यांमध्ये भरलेल्या वेगवेगळय़ा बिस्किटांमधला कुकीज आणि रोट यांच्या मधलाच काहीतरी एक प्रकार मी घेतला आणि निवांत खात-खात चालायला सुरुवात केली. अनोळखी शहरात फिरताना हा एक फायदा असतो, ‘काय रस्त्याने खात फिरतायेत,’ असे म्हणणारे कुणीही तिथे नसते.
अजमेर गेट ओलांडून आम्ही चालायला सुरुवात केली. पुरानी दिल्ली हा भाग आजवर कधीच पाहिला, अनुभवला नव्हता. चालता चालता नजर आजूबाजूच्या परिसराचा वेध घेत होती. छोटय़ा गल्ल्या, खूप गिचमिडीने बांधलेली घरे, रस्त्यावर अगदी आपल्या हातभर उंचीवरून जात असलेले लाईटच्या वायर्सचे जाळे हे पाहताना दिल्लीचे हे रूप आश्चर्यचकित करत होते. इथल्या बऱयाच घरांवर मोगली बांधकाम शैलीची झाक जाणवत होती. काही ठिकाणी दारे-खिडक्यांवर नाजूक कलाकुसर दिसत होती. ते बांधकाम बरेच जुने आहे हे कळत होते.
इथे एका ठिकाणी कोपऱयावरचे एक छोटेसे दुकान उघडलेले दिसले. कामाला निघालेली माणसे तिथे उभी राहून नाश्ता करत होती. आम्ही तिथे डोकावल्यावर गल्ल्यावरच्या माणसाला आनंद झाला. त्याने सुचवलेला त्यांची स्पेशालिटी असणारा मिल्क केक तिथे घेतला. ताजा, माफक गोड असा तो मिल्क केक खाऊन फार बरे वाटले. तोवर झालेल्या पायपिटीवरचा हा उतारा झकास होता.
दिल्लीत अजूनही खूप काही खाण्यासारखे, अनुभवण्यासारखे आहे. ते पुढच्या लेखात. तोवर मस्त खा नि स्वस्थ राहा.
(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)
[email protected]



























































