निसर्ग नियम अन् आहारविहार

>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ

सर्केडियन रिदम म्हणजेच दैनिक लयबद्धता. म्हणजेच निसर्गाच्या घडय़ाळाबरोबर शरीराचे घडय़ाळ सेट करायचे. निसर्ग नियमानुसार आहारविहार आणि जीवनशैली ठेवून आपण जर निसर्ग आणि आपली दिनचर्या यात जर समन्वय साधला तर उत्तम आरोग्यासाठी ती एक मोठी सुरुवात ठरेल.

पूर्वी लोक दैनिक लयबद्धता पद्धत पाळत होतेच की… म्हणजे पहाटे काsंबडा आरवला की उठायचे, उठले की सकाळची कामे सडा संमर्जन झाले की न्याहारी, मग दुपारी जेवण आणि संध्याकाळी लवकर जेवण आणि लवकर झोपणे!!

दिवसाची वेळ आणि चयापचय यांचादेखील खूप जवळचा संबंध असतोच. काही अभ्यासातून हे समोर आले की, जे दुपारी 3 पर्यंत व्यवस्थित खातात आणि त्यानंतर हलका आहार घेतात त्यांना वजन कमी करायला खूप उपयोग होतो.

सध्या इंटरमीडिएट फास्टिंग नावाचं लडिवाळ बाळ जन्माला आलंच आहे. त्याचा एक अर्थाने संबंध पण आपण या योग्य दिनचर्येत लावू शकतो. म्हणजे बघा सकाळी 6 ते संध्याकाळ 6 हे सूर्योदय ते सूर्यास्त ही वेळ. यात खाल्लं की झालं 12 तासांची विंडो तयार आणि पुढचे 12 तास तोंडाला कुलूप… नो सूर्य नो खाना पिना? तोंडाला 12 तास कुलूप हे खरे असले तरी पोषक घटकांना ठेंगा आणि पुढे करा शिमगा असा प्रकार नको व्हायला.

आता थोडे आपले हॉर्मोन्स आणि दिनचर्या याबद्दल बोलूया. दिवसा आपली इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी चांगली असते आणि melatonin ची पातळी कमी असते. त्यामुळे आपल्याला उत्साही आणि फ्रेश वाटत असते आणि रात्री हे बरोबर उलटे असते. रात्री melatoninची पातळी वाढते. ज्यामुळे आपल्याला झोप यायला मदत होते. यासाठी जेव्हा इन्शुलिनचे कार्य मस्त चालते तेव्हाच खाल्ले तर बरे नाही का?

आता जे लोक उशिरा झोपतात त्यांच्यासाठी खास…

झोपेचे खोबरे झाले किंवा केले की त्याचा परिमाण gherlin आणि leptin या दोन हॉर्मोनवर होतो. Gherlin हे भूक वाढवणारे हॉर्मोन आहे तर leptin भूक कमी करणारे! झोप कमी झाली की gherlin वाढते आणि leptin कमी होते. काय येतंय ना ध्यानात? मग वाढते आपली भूक आणि गोड धोड खायची इच्छा. वाटेल तशी झोपेची वेळ, कधी पण जेवणे असे निसर्गाविरोधात बंड पुकारले की मग डायबेटिस, हृदयविकार, वजन वाढ हे मागे लागायला वेळ लागणार नाही.

निसर्ग नियमानुसार डाएट करायला हवे

1. सकाळी उठल्यावर दोन तासांच्या आत काहीतरी खायला हवे. यावेळी चयापचय उत्तम असते.
2. दिवसातून वेळेनुसार, तीन वेळा मुख्य आहार आणि दोन वेळेस थोडे खाणे असा आहार हवा.
3. शक्यतो सूर्योदयाच्या आत उङ्गले पाहिजे. व्यायाम, सूर्य नमस्कार आणि सूर्यप्रकाशात चालणे उत्तम.
4. सकाळचा नाश्ता आणि जेवण व्यवस्थित आणि पोषक असावे. रात्रीचा आहार हलका असावा.
निसर्ग आणि आपली दिनचर्या यात जर समन्वय साधला तर उत्तम आरोग्यासाठी ती एक मोठी सुरुवात ठरेल.