
> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार
तुमच्यात संपत्ती निर्माण करण्याची क्षमता असेल तर तुम्ही खऱया अर्थाने श्रीमंत!
आपल्या मुलीचं लग्न गरीब घरातील मुलाशी लावाल का ? अॅलन मस्क या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला एका सभेमध्ये एक गमतीदार प्रश्न विचारला गेला. तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न गरीब किंवा सर्वसाधारण घरातल्या मुलाशी लावून द्याल का ? प्रश्न खूप मार्मिक होता, पण अॅलन मस्कने जे उत्तर दिलं ते मात्र खूप विचार करायला लावणारं होतं.
अॅलन मस्क म्हणाला, तुमचं बँक अकाऊंट एकवेळ पैशानं लठ्ठ नसेल तरीही चालेल, पण तुमच्यामध्ये संपत्ती निर्माण करण्याची क्षमता असेल तर त्याला खऱया अर्थानं श्रीमंत म्हणू शकतो. कारण अचानक पैसे मिळवून श्रीमंत असलेले लोक संपत्ती निर्माण करायची क्षमता नसल्यामुळे पुन्हा गरीब झाल्याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात.
हाच धागा जोडून जर आपण श्रीमंतीचा विचार केला तर पैसा हाताळण्याची क्षमता आणि आर्थिक शिस्तही तेवढीच महत्त्वाची आहे हे विसरता कामा नये. पूर्वजांच्या कृपेमुळे मिळालेली जमीन विकून अनेकांनी खूप पैसा मिळविला. कधीही न बघितलेला पैसा पाहिल्यावर डोपं ठिकाणावर राहत नाही. त्यामुळे नियोजन न करता महागडी घरं, विदेशी गाडय़ा व पॉश घडय़ाळे व सोन्याच्या चैनी यामध्येच पैसा खर्च झाला. पैसा पाण्यासारखा असल्याने वाहून गेला व तो संपल्यावर पुन्हा गरिबीत दिवस काढायला लागले अशी उदाहरणेदेखील आपण पाहिली असतील.
त्यामुळेच उद्योग किंवा नोकरी करून संपत्ती निर्माण करण्याची क्षमता, पैसे हाताळण्याची क्षमता व आर्थिक शिस्त जर असेल तर माणूस गरीब असूनदेखील श्रीमंत होतो. पैसा मिळाल्यावर लगेच खर्च करण्याचा मोह टाळून आधी बचत, मगच खर्च ही वृत्ती अंगात भिनवायला हवी. नाहीतर ‘मिळाला पैसा की कर खर्च’ ही वृत्ती वृद्धापकाळातही आपल्याला काम करायला भाग पाडू शकते.
आपण कमवतो किती आणि जीवनशैली साकारण्यासाठी किती खर्च करतो हेदेखील प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यायला हवे. चैनीची जीवनशैली उपभोगण्याच्या हव्यासापायी व्रेडिट कार्डच्या जाळ्यात एकदा आपण अडकलात तर ‘हां हां’ म्हणता कर्जाचा डोंगर उभा राहू शकतो. त्यामुळे आपल्या निव्वळ कमाईच्या 40 टक्के भाग आधी कमी, मध्यम व लांब पल्ल्याच्या ध्येयासाठी गुंतवायला हवेत. यामध्येही नुसताच जोखमीच्या गुंतवणुकीचा भरणा न करता सुरक्षित गुंतवणूक साधनांचादेखील भरणा करायला हवा. आपल्या कर्जाचा हप्ता उत्पन्नाच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त असताच कामा नये. उरलेल्या 30 टक्क्यांमध्ये आपली जीवनशैली साकारली गेली पाहिजे. कर्जाचा हप्ता एकदा का 30 टक्क्यांच्या वर गेला की, मग बचतीशी तडजोड होणार व त्यामुळे भविष्यातल्या गरजांसाठी पुन्हा कर्ज काढायला लागणार. हा आर्थिक बेशिस्तीचा कारभार आपल्याला गरिबीकडे घेऊन जाईल हे ध्यानात घ्यायला हवे.
…आणि अर्थात याशिवाय अॅलन मस्कने सांगितल्याप्रमाणे संपत्ती निर्माण करण्याची क्षमता असायला हवी. त्यामुळे आपण केलेल्या कामधंद्यामुळे आपण नवा पैसा उभा करू शकता व श्रीमंत होऊ शकता. म्हणून माझा जावई एकवेळ पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल, पण वृत्तीने गरीब नको. त्याच्या वृत्तीमध्ये संपत्ती निर्माण करण्याची व सांभाळण्याची क्षमता असेल तर तो एक दिवस आपोआप श्रीमंत होईल.



























































