लेख – हजार प्रयोगांचे नाटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र पांडुरंग पेम

सुखात असो वा दुःखात, प्रेमात असो वा रागात, एकटा असो वा मित्रांत… मराठी माणूस नाटकालाच जातो. नाटकाला जाण्यासाठी मराठी माणूस कारणच शोधत असतो. नाही सापडलं कारण तर विनाकारण जातो, पण नाटकाला जातो आणि एखादं नाटक हृदयात बसलं तर सच्च्या मित्राप्रमाणे आयुष्याचा शेवटचा अंक संपेपर्यंत ते हृदयातच राहतं. अशाच नाटकांचे हजारो प्रयोग होतात. हजार प्रयोगवालं नाटक येतं तेव्हा रंगभूमीवर झंझावात येतो. तिसऱया लाटेची पर्वा न करता अनेक नाटकांचे प्रयोग सुरू झाले. नवीन नाटकं आली, पण आता गरज आहे पुन्हा त्या झंझावाताची. एखाद्या धमाल विनोदी हजार प्रयोगी नाटकाची!

मराठी व्यावसायिक रंगभूमीला समृद्ध, श्रीमंत करण्यात जसं गंभीर आणि संगीत नाटकांचा हात आहे, तसं विनोदी नाटकांचंही मोठं योगदान आहे. माझा व्यावसायिक प्रवास सुरू झाला त्याआधी ‘वात्रट मेले’, ‘मोरूची मावशी’, ‘वस्त्रहरण’, ‘वन रूम किचन’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या विनोदी नाटकांनी धुमाकूळ घातला होता. मग ‘ऑल द बेस्ट’ आलं. नेहमीच्या पारंपरिक प्रेक्षकांबरोबर तरुणाईलाही थिएटरकडे आणण्यात हे नाटक यशस्वी झालं. त्यामुळे अनेक भाषांत हे नाटक सुपरहिट झालं. मग ‘यदाकदाचित’ने जादू केली. त्यानंतर ‘हसवा फसवी’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘जाऊबाई जोरात’, ‘सही रे सही…’ या साऱया नाटकांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या प्रत्येक नाटकाने हजार प्रयोगांचा टप्पा पार केला! ‘तो मी नव्हेच’ नाटकानेही तो पार केलाय. ‘नटसम्राट’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’, ‘लग्नाची बेडी’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘ती फुलराणी’, ‘पांडगो इलो रे बा इलो’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘आई रिटायर्ड होते’, ‘टूर टूर…’ अशा अनेक सुंदर लँडमार्क नाटकांचेही सलग किंवा संयुक्तिक हजार प्रयोग बहुदा झालेच असतील. यात विनोदी नाटकांची संख्या जास्त आहे एवढंच मला म्हणायचंय. उत्कृष्ट दर्जाची हजारो अभिजात नाटकं मराठी रंगभूमीवर आली, सुपरहिट झाली.
पण हजार प्रयोगांचा टप्पा पार करण्याचा मान मात्र मोजक्याच नाटकांना लाभला. हो… मानच तो!!! मायबाप रसिक प्रेक्षकांनी दिलेला मान!!! नाटक हजार प्रयोगांचं आहे हे रसिकांशिवाय दुसरं कोण ठरवणार? चला… आता हजार प्रयोगांचं नाटक लिहूया… असं म्हणत लेखक लिहायला बसत नाही. हजार प्रयोगांचं नाटक बसवतो म्हणत दिग्दर्शक नाटक उभं करू शकत नाही. रसिक प्रेक्षक एखाद्या नाटकाच्या प्रेमात पडल्याशिवाय त्या नाटकाचे 1000 प्रयोग होऊच शकत नाहीत. काही नाटकं रसिकांना आवडतात. ती हिट होतात. काही नाटकं रसिकांना नुसती आवडत नाहीत तर त्यांच्या मनात घर करून बसतात. ती नाटकं रसिक पुन्हा बघायला येऊन सुपरहिट करतात, पण त्यातलं एखादंच नाटक असं असतं जे रसिकांना आवडतं, त्यांच्या मनात घर करतं आणि मग त्यांना प्रेमात पाडतं!!! कितीही वेळा बघून हे नाटक प्रत्येक वेळी तितकाच आनंद देईल… हा विश्वास रसिकांच्या मनात निर्माण करतं. रसिकांना भेटीसाठी आतुर करतं… आणि पुनः पुन्हा प्रेमाने थिएटरवर खेचून आणतं… त्याच्याच खिशातल्या पैशांनी तिकीट काढायला लावून!! ते नाटक हजार प्रयोगांचा टप्पा पार करतं!! त्या नाटकावरील प्रेमाची मोहिनी आयुष्यभर रसिकाच्या मनातून उतरत नाही. एकच नाटक तो रसिक कित्येक वेळा बघतो. स्वतःचे आई-बाबा जबरदस्ती घेऊन जातात तेव्हा तो पहिल्यांदा बघतो. आवडलं म्हणून प्रेयसीला नेतो. लगेच मित्र म्हणतात… तू बदललास यार… म्हणून मित्रांबरोबर बघतो. ‘प्रेम जमलं तेव्हा हेच नाटक आपण पाहिलेलं’ म्हणत लग्नाच्या ऍनिव्हर्सरीला बायकोला तेच नाटक बघायला नेतो. आपल्या आईबाबांनी आपल्याला दाखवलं म्हणून तो स्वतःच्या आईबाबांना घेऊन जातो. बायको म्हणते, माझे आईबाबा विसरलास… म्हणून तिच्या आईबाबांना घेऊन जातो. काही जण आपल्या आईबाबांनी आपल्याला दाखवलं म्हणून कर्तव्यभावनेने स्वतःच आईबाबांना घेऊन जातात. बायको म्हणते, माझ्या आईबाबांना विसरलास… म्हणून तिच्या आईबाबांना घेऊन जातात. आपण आपल्या आईबाबांना नेलं तसं म्हातारपणी आपल्या पोरांनी आपल्याला न्यायला हवं म्हणून काही जण त्यांच्या मुलांना घेऊन जातात. मुलं नाटकाच्या प्रेमात पडतात. काही मुलं परीक्षेत पहिली येतात. काही नापास होतात, पण दोघेही बाजूबाजूला बसून तेच नाटक एन्जॉय करतात. काही संसारात भांडणं सुरू होतात.

मग घरी लवकर कशाला जायचं? म्हणत ते नाटकाला बसतात. काही घरात अबोला सुरू होतो. ते नवरा-बायको एकाच घरातून निघतात. वेगवेगळ्या मार्गाने त्याच नाटकाला जाऊन बाजूबाजूला बसतात. एकमेकांशी एकही शब्द न बोलता नाटक फुल टू एन्जॉय करतात. नकळत एकमेकांना टाळ्या देतात… इंटरव्हलला दोघे एकाच कपातला चहा नाटकावर गप्पा मारत पितात. काही संसारात काही वर्षांनी प्रेम आटतं. घटस्फोट होतात. दोघे एकमेकांचं तोंड बघत नाहीत, पण वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळे जाऊन तेच नाटक बघतात. रडत रडत नाटकाला येतात. हसत हसत आपापल्या वेगवेगळ्या घरी जातात. काही जणांचं दुसरं लग्न ठरतं तेव्हा नवीन नवरा- बायको त्याच नाटकाला जातात… मग पुन्हा चक्र सुरू!! म्हणजे सुखात असो वा दुःखात, प्रेमात असो वा रागात, एकटा असो वा मित्रांत… मराठी माणूस नाटकालाच जातो. नाटकाला जाण्यासाठी मराठी माणूस कारणच शोधत असतो. नाही सापडलं कारण तर विनाकारण जातो, पण नाटकाला जातो आणि एखादं नाटक हृदयात बसलं तर सच्च्या मित्राप्रमाणे आयुष्याचा शेवटचा अंक संपेपर्यंत ते हृदयातच राहतं. अशाच नाटकांचे हजारो प्रयोग होतात. हजार प्रयोगवालं नाटक येतं तेव्हा रंगभूमीवर झंझावात येतो. त्या नाटकाची पॉवर एवढी असते की, प्रेक्षकांना प्रेमात पडण्यावाचून दुसरा पर्यायच ते नाटक ठेवत नाही. आबालवृद्ध प्रेक्षक थिएटरकडे अक्षरशः जादू झाल्यासारखा खेचला जातो. टेलिव्हिजन सीरियल्स, क्रिकेट मॅच, संकष्टी, एकादशी, परीक्षा, दिवाळी, शिमगा… कसलाही फरक त्या नाटकाला पडत नाही. थिएटर्स रसिकांनी ओव्हर फ्लो होऊन वाहू लागतात. हाऊस फुल्लचे बोर्ड ऑड डेलाही झळकू लागतात. रंगभूमीवरची आर्थिक गणितं बदलतात. ट्रेंड बदलतात, घराघरांत फक्त त्याच नाटकाची चर्चा होते. संपूर्ण वातावरण त्या हजार प्रयोगी नाटकमय होऊन जातं!!! या नाटकाची जादू एवढी असते की, नाटकासंबंधी प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर त्या नाटकाच्या नावाने ओळखली जाते. 28 वर्षांनी आजही मी ‘ऑल दि बेस्ट’वाला देवेंद्र पेम आहे!! अशा नाटकांनी दिले संतोष पवार, केदार शिंदे, पुरुषोत्तम बेर्डे… ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांनी लिहिलेल्या तर 3 नाटकांनी हजार प्रयोगांचा टप्पा पार केलाय आणि दिले रंगभूमीचे सुपरस्टार… दादा कोंडके, मच्छिन्द्र कांबळी, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रभाकर पणशीकर, मधुकर तोरडमल, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, भरत जाधव, प्रशांत दामले!! हजार प्रयोगी नाटकांनी त्यांच्या निर्मात्यांना आणि संस्थेला आयुष्यभरासाठी उभं केलंय. सुधीर भट यांच्या ‘सुयोग’ नाटय़संस्थेच्या यशात ‘मोरूची मावशी’चा आईचा वाटा आहे. हे सारं आज आठवण्याचं कारण सुपरहिट ‘सही रे सही’नंतर तसं नाटक आलंच नाही. त्याला अनेक कारणं आहेत. गेल्या दहा वर्षांत चॅनल्सनी मारलेली मुसंडी, बिझी झालेले कलाकार व तंत्रज्ञ, बिघडलेली तारखांची, पाकिटांची गणितं, यातून रंगभूमीने मार्ग काढला. वीकेंड थिएटर!! तर थडकलं ओटीटी!! युवा पिढी त्याच्या मागे धावली, पण थिएटरवर नाही पोहोचली. नाटकं कशी चालली? डिजिटल युग आहे. काळाबरोबर जायलाच हवं, म्हणत रंगभूमीने आव्हान पेलले. रंगकर्मी पेटून उठला. निर्मात्यांना टेन्शन आले, पण नवीन नाटकं मात्र काढली! मग आला कोरोना. प्रयोग मत करोना. नाटकवाल्यांना घरात करमेना… पण बाहेर पडल्यावर मरतो ना… कमाई थांबली ना.. भूक तर लागतेच ना… पण 2 वर्षे झाली ना.. लाटा काही थांबेना.. शेवटी रंगकर्मी म्हणतो ना… दोन लस झाल्या ना… आता बाहेर पडतो ना… असं तसं मरायचंच तर प्रयोग करताना मरतो ना. रंगभूमीने पुन्हा कात टाकली. तिसऱया लाटेची पर्वा न करता अनेक नाटकांचे प्रयोग सुरू झाले. नवीन नाटकं आली, पण आता गरज आहे पुन्हा त्या झंझावाताची. एखाद्या धमाल विनोदी हजार प्रयोगी नाटकाची! जे सगळी टेशन्स, दुःख रसिकांना विसरायला लावेल, खदखदून हसवेल, पुन्हा एकदा स्वतःच्या प्रेमात पाडेल! मग सुरू होईल एक प्रेमकहाणी, तो रसिक आणि ती रंगभूमी यांची! दोघे थिएटरमध्ये एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असताना थिएटरच्या बाहेर बोर्ड लागेल, ‘हाऊस फुल्ल’!!!