संचित – गाडगेबाबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

सतत 50 वर्षे समतेचा संदेश देणारा तसंच जगणारा, नि:स्पृह आणि विलक्षण प्रतिभेचा संत रुढार्थाने निरक्षर आणि अशिक्षित असलेले किती प्रज्ञावंत आहेत याविषयी महाराष्ट्रातील दिग्गजांनी त्यांच्याच काळात लिहून ठेवलेले आहे. त्यांचे अखेरचे कीर्तन यू-ट्यूबवर उपलब्ध आहे. त्यातून आपल्याला गाडगेबाबांचा आवाज, शैली आणि विचार सहज समजतात.

साधारणपणे 1915 ते 30 चा काळ. महाराष्ट्रातल्या एखाद्या गावखेड्यात एक माणूस यायचा. अंगावर स्वत:च शिवलेल्या चिंध्यांचा स्वच्छ अंगरखा, डोक्यावर मडक्याचा तळ म्हणजे खापर आणि हाती झाडू. कोणाशीही न बोलता एकाकीपणे त्याचं गावातले रस्ते झाडण्याचं काम सुरू व्हायचं. अथकपणे काम करणारा हा माणूस अचानक उगवला कुठून हे गावकऱयांना उमगायचं नाही. कोणी चेष्टा करायचे, कोणी कुतूहलाने बघत राहायचे. कोणी काही विचारलं तरी नाव, पत्ता न सांगता या माणसाचं काम सुरू राहायचं. मध्यान्ह झाली की दया येऊन आणि त्याच्या स्वच्छतेच्या कार्यावर खूश होऊन कुणी तरी भाजी, भाकरी द्यायचं. ती डोक्यावरच्या खापरात ठेवून काम संपलं की जवळच्या नदी, ओढ्यावर हातपाय स्वच्छ धुऊन हा अजब वाटणारा दाढीधारी, पण तेजस्वी तरुण झाडाखाली बसून शांतपणे जेवण करायचा.

तोपर्यंत तिथे आलेलं कोणी विचारायचं, ’कशापायी एवढे कष्ट करतोस? कोणी पाठवलं तुला? तू आलास कुठून?’ यावर तो तरुण एका वाक्यात उत्तर द्यायचा, ’संध्याकाळी देवळात कोन्या बोआचं कीर्तन आहे म्हने. त्यानं मला पाठवलं पुढे स्वच्छता करायला.’

संध्याकाळी दिवे लागणीनंतर देवळाच्या अंगणातून ’गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपाला’ असे भजनाचे सुरेल सूर कानी पडायचे. कंदील घेऊन गावकऱयांची पावलं देवळाकडे वळायची आणि सकाळचाच माणूस कीर्तन करताना दिसायचा. विचित्र वेश आणि हाती दोन चपटे दगड. त्यावर ताल धरून कीर्तन चायचं. लोक म्हणायचे, ’हा कोणी विक्षिप्त दिसतो. उगाच आलो. चला जाऊ परत.’ ते निघाले की या ’विक्षिप्त’ वाटणाऱया माणसाच्या मुखातून जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंग कानी पडायचे आणि त्यावरचं स्पष्ट, रसाळ आणि वैदर्भी भाषेतलं निरुपण. समस्त जनांना समतेचा, शिक्षणाचा, अज्ञानाविरुद्ध लढण्याचा, व्यसनमुक्त होण्याचा संदेश देणारे परखड विचार ऐकू यायचे. निघालेली माणसं थबकायची. आणखी यायची आणि या समाजसुधारक संताची वाणी, क्षणोक्षणी त्यांची कानउघाडणी करीत प्रबोधनाची शिकवण द्यायची.
आपल्या महाराष्ट्राचं भाग्य असं की, सतत 50 वर्षं समतेचा संदेश देणारा तसंच जगणारा, नि:स्पृह आणि विलक्षण प्रतिभेचा संत आपल्याकडे निर्माण झाला. निरक्षर आणि अशिक्षित असलेले हे गाडगेबाबा किती प्रज्ञावंत आहेत याविषयी महाराष्ट्रातील दिग्गजांनी त्यांच्या काळात लिहून ठेवलं आहे. प्रबोधनकार ठाकरे, स्वत: सत्याशोधकी समाजसुधारक. त्यांनी गाडगेबाबांचं कीर्तन ऐकलं, कार्य जवळून पाहिलं आणि त्यांच्यावर एक महत्त्वपूर्ण पुस्तकही लिहिलं. भाषाप्रभू असलेले प्रबोधनकार गाडगेबाबांविषयी म्हणतात, ’आस्तिक असो वा नास्तिक, कोणाही माणसाला गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहज गुंतवून ठेवू शकतात. त्यांच्या कीर्तनाचं शब्दांत वर्णन करणं कठीणच.’

आचार्य अत्रे यांनी त्यांच्या शैलीत गाडगेबाबांविषयी म्हटलंय, ’सिंहाला पाहावं वनात, हत्तीला पाहावं रानात, तसं गाडगेबाबांना पाहावं कीर्तनात. आम्ही स्वत:ला साहित्यिक वगैरे मानतो, पण गाडगेबाबांचं कीर्तन ऐकेपर्यंतची आयुष्याची पंचावन्न वर्षे फुकट गेली असं वाटतं.’

एवढी ताकद गाडगेबाबांच्या शब्दांत होती. ते केवळ शाब्दिक कीर्तनकार, प्रवचनकार नव्हते. अतिशय कृतिशील आणि स्वत:साठी रोजची एखादी भाकर आणि थोडंसं कालवण आधी कष्टाचं काम करून मिळवत. लोकांची कुचेष्टा, त्यांनी केलेला अपमान सहन करीत त्यांनी विराट कार्य उभं केलं. योगायोगाने 1956 मध्ये त्यांचं एक कीर्तन मुंबईत टेप केलं गेलं. ते आता यूट्यूबवर उपलब्ध असेल. त्यातून आपल्याला गाडगेबाबांचा आवाज, शैली आणि विचार सहज समजतात. हे कळल्यावर 1978 मध्ये मी ते कीर्तन मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मुंबईच्या गाडगेबाबा मिशनपासून ते पंढरपूरच्या संत चोखामेळा धर्मशाळेपर्यंत अनेक ठिकाणी भ्रमंती केली. गाडगेबाबांचे एक चरित्रकार गो. नी. दांडेकर यांच्याशी पत्रव्यवहारही केला. पण यश आलं नाही. नंतर त्या कीर्तनाची ’कॅसेट’ उपलब्ध झाली. आचार्य अत्रे निर्मित ’महात्मा फुले’ चित्रपटात आरंभीच गाडगेबाबांचं चार वाक्यांचं चित्रण अत्रे यांनी केलं. त्याला ’मंगलाचरण’ असं समर्पक नाव दिलं. त्यात गाडगेबाबा महात्मा फुले यांच्याविषयी चार वाक्ये बोलताना आणि ’देवकीनंदन गोपाला’ म्हणताना दिसतात. त्यांचं हे एकमेव फिल्मिंग उपलब्ध आहे. आता तेही कदाचित यूट्यूबवर असेल. मी पुण्याच्या अलुरकरांकडून या चित्रपटाची व्हिडीओ कॅसेट विकत घेतली. त्या ’महात्मा फुले’ चित्रपटात गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, स्वत: आचार्य अत्रे यांचं दर्शन होतं. माझ्या संचितातला हा अमूल्य ठेवा आहे असं मी मानतो.
[email protected]